कल्याण-डोंबिवलीला एमएमआरडीएकडून ३६१ कोटींचा निधी; ३१ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी

भगवान मंडलिक

डोंबिवली : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कल्याण-ड़ोंबिवली तसेच लगत असलेल्या २७ गावांमधील एकूण ३१ रस्त्यांचा कायापालट करण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला असून यासाठी ३६० कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ िशदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधीचे पाट खुले केल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. 

प्राधिकरणाच्या विस्तारित मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या ३१ कामांची सविस्तर अंदाजपत्रके नकाशासहित पालिकेने दाखल केल्यानंतर एमएमआरडीकडून निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या कामांसाठी  आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या पालिका प्रशासनाने पूर्ण कराव्यात. कल्याण डोंबिवली पालिकेने त्यांच्यातर्फे केल्या जाणाऱ्या सात रस्ते कामांची प्राकलने, खर्चाचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया आणि ठेकेदार नियुक्तीची कामे लवकर पूर्ण करून प्राधिकरणाला तसे कळवावे, अशा सूचना एमएमआरडीएचे मुख्य अभियंता एस. ए. वांढेकर यांनी केल्या आहेत.

निवडणुकीपूवीर्ची बेगमी

महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होतील असा अंदाज आहे.  पाच वर्षांपूर्वी  घेण्यात आलेल्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहरांच्या विकासासाठी जाहीर केलेले सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज गाजले होते. या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ िशदे यांच्या अखत्यारीत येणाऱ्या एमएमआरडीएने डोंबिवली शहरातील ३१ रस्ते कामांचे प्रस्ताव मंजूर केल्याने या मंजुरीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

मंजूर रस्ते कामे

डोंबिवली

  • ठाकुर्ली पूल ते म्हसोबा चौक
  • शिळ ते संदप उसरघर रस्ता
  • डोंबिवली पूर्व गजानन चौक ते नांदिवली नाला
  • स्टार कॉलनी-समर्थ चौक
  • संत नामदेव पथ-मानपाडा रस्ता
  • टिळक पुतळा-रामनगर टपाल ऑफिस
  • शिवमंदिर-संगीतावाडी रस्ता
  • इम्प्रेस मॉल – नांदिवली पाडा
  • जुनी डोंबिवली ते रेल्वे फाटक
  • वृंदावन सोसायटी-वर्तुळाकार रस्ता
  • मोठागाव-कोपर रस्ता

कल्याण पूर्व

  • कल्याण पूर्व आंबेडकर चौक-जगदीश दुग्धालय
  • क्रिस्टल प्लाझा-लोकग्राम
  • विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक-सूर्या चौक
  • विजयनगर-आमराई चौक
  • नूतन मराठी शाळा-नाना पावशे चौक
  • शिवाजी कॉलनी-जनता बँक
  • तिसाई मंदिर रस्ता
  • चिंचपाडा- डीेएसएम शाळा
  • मलंग रस्ता-म्हसोबा चौक
  • आकाश कॉलनी-वसार रस्ता
  • उंबार्ली रस्ता
  • भालगाव रस्ता
  • अडिवली ते तलाव रस्ता
  • व्हीनस चौक-व्हीटीसी मैदान

कल्याण पश्चिम

  •   वल्लीपीर रस्ता-गोिवदवाडी रस्ता
  •   डॉ.आंबेडकर चौक-मासळी बाजार

या कामांना पालिका स्तरावरील आवश्यक मंजुऱ्या, आराखडे तयार करून पालिकेने ते प्राधिकरणाला दाखल करायचे आहेत. ही कामे मार्गी लागतील त्याप्रमाणे निधी पालिकेकडे वर्ग केला जाणार आहे.

एस. ए. वांढेकर, मुख्य अभियंता, एमएमआरडीए

प्राधिकरणाने डोंबिवली शहरातील ३१ रस्ते कामांना मंजुरी दिली आहे. यामधील सात कामे पालिकेतर्फे केली जाणार आहेत. या कामांचे नकाशे, प्राकलने तयार करण्याचे आदेश विशेष प्रकल्प विभागाला दिले आहेत. हे प्रस्ताव प्राधिकरणाने मंजूर केले की रस्ते कामाच्या प्रक्रिया सुरू केल्या जातील.

सपना कोळी, शहर अभियंता, कडोंमपा