हॉटेलमालक, बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या
कुख्यात अंडरवल्र्ड डॉन छोटा राजन हा गजाआड गेल्यापासून मुंबई परिसरात हातपाय पसरण्यास सुरुवात करणाऱ्या कुख्यात गुंड रवी पुजारी याच्या टोळीने आता आपला मोर्चा वसई-विरार शहरांकडे वळवला आहे. येथील हॉटेलमालक तसेच बांधकाम व्यावसायिकांना रवी पुजारीच्या गुंडांकडून खंडणीसाठी धमक्या येऊ लागल्या असून गेल्या १५ दिवसांत अशा तीन तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन गजाआड गेल्यानंतर रवी पुजारी टोळीने पुन्हा जोर लावला आहे. या वेळी त्याने वसई-विरारला लक्ष्य केले आहे. गेल्या पंधरा दिवसांत त्याने वसईतल्या दोन हॉटेल व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावले होते. वसईतल्या एका प्रख्यात हॉटेलमालकाकडे त्याने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्याबाबतचा गुन्हा माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर नालासोपारा येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडेही त्याने गेल्या आठवडय़ात ५० लाखांची खंडणी मागितली होती. गुरुवारी वसईत एका बांधकाम व्यावसायिकाकडे रवी पुजारीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. याबाबत त्या बांधकाम व्यावसायिकाने पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ‘मी माझे मोबाइल क्रमांक बदलले तरी माझ्या बोरिवलीतील कार्यालयात तसेच कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर धमकीचे फोन आले होते. हे सर्व परदेशातून आलेले कॉल्स होते. त्याची खात्री केल्यानंतर ते रवी पुजारीने केल्याचे उघड झाले,’ असे या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

स्थानिक तरूणांचे नेटवर्क
रवी पुजारी टोळीच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देताना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी सांगितले की, रवी पुजारी हा परदेशात असला तरी त्याने आपल्या खबऱ्यांचे जाळे मुंबईत तयार केले आहे. स्थानिक तरुणांना त्यात सहभागी करून घेतले आहे. हे तरुण बिल्डर, हॉटेल व्यावसायिकांची माहिती, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि इतर फोन क्रमांक काढून रवी पुजारीकडे पोहोचवतात. खंडणीची रक्कमसुद्धा हे खबरी स्वीकारतात आणि हवालामार्फत पोहोचवतात. वसई विरारमध्येसुद्धा रवी पुजारी टोळीने आपले जाळे उभारले असावे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही या टोळीच्या सदस्य आणि इतर हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. लवकरच आम्ही त्यांना पकडण्यात यश मिळवू, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.