scorecardresearch

गावदेवी वाहनतळ महिनाभरात खुले होणार, ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती

गावदेवी वाहनतळ ४ हजार ३३० चौरस मीटरचे आहे. त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे.

ठाणे : येथील गावदेवी मैदानात दुचाकी आणि चारचाकी वाहनांकरिता भुमीगत वाहनतळ उभारणीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु असून याठिकाणी कार उद्वाहक, विद्युत व्यवस्था तसेच इतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात हे वाहनतळ नागरिकांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉविपीन शर्मा यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांना वाहनतळाची सुविधा मिळण्याबरोबरच रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला पायबंद बसून येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची चिन्हे आहेत.

ठाणे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. स्थानकालगतच मुख्य बाजारपेठही आहे. त्यामुळे स्थानक परिसर तसेच गावदेवी भागात वाहनांची मोठी वर्दळ सुरु असते. या भागांमध्ये पुरेशा वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे अनेकजण रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश असतो. या वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा होऊन कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने स्मार्च सिटी योजनेंतर्गत गावदेवी मैदानात दुचाकी आणि चारचाकी वाहनांकरिता भुमीगत वाहनतळ उभारणीचा निर्णय घेऊन त्याचे काही वर्षांपुर्वी काम सुरु केले. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्याची पाहाणी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी बुधवारी केली. गावदेवी वाहनतळ ४ हजार ३३० चौरस मीटरचे आहे. त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. या वाहनतळमध्ये कार उद्वाहक, विद्युत व्यवस्था तसेच इतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊन वाहनतळ नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ शर्मा यांनी दौऱ्यादरम्यान सांगितले.

गावदेवी भागातील भाजी मंडई इमारतीच्या तळघरात दुचाकीसाठी उभारण्यात आलेले वाहनतळ दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. त्यालगतच्या मैदानातच उभारण्यात येत असलेले भुमीगत वाहनतळही महिनाभरात खुले होणार असल्याचे आयुक्त शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. या दोन्ही वाहनतळामुळे नागरिकांना वाहनतळाची सुविधा मिळण्याबरोबरच त्यांची बेकायदा पार्किंगमुळे होणाऱ्या कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

प्रकल्प काय?

गावदेवी वाहनतळ उभारणीच्या कामानंतर मैदान पूर्ववत केले जाणार आहे. या ठिकाणी वाहनतळाव्यतिरिक्त बगीचा, कारंजे, मनोरंजनाची साधने अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यामुळे मैदान बाधित होणार नाही तसेच या मैदानाचा वापर पूर्वीप्रमाणेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी करता येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gavdevi parking lot will be open within a month informed by thane municipal commissioner asj

ताज्या बातम्या