घोडबंदर येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहातील दुरूस्तीच्या कामांचा सुमारे २६ लाख रुपयांचा प्रस्ताव गुरुवारच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांनी एकमताने फेटाळून लावला असून या कामाचा निधी रुपादेवी पाडय़ातील शौचालये दुरूस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेले अनेक वर्षे या शौचालयांच्या दुरूस्तीसाठी निधी मिळत नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र, दुसरीकडे प्रशासनाने डॉ. घाणेकर नाटय़गृहाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला होता. त्यामुळे सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची सभेसाठी सभागृह अपुरे पडू लागले असून या सभागृहात अधिकारी-पत्रकार आदींना बसण्यासाठी जागा नसते. यामुळे स्थायी समितीच्या सभेसाठी नवे सभागृह बांधण्याची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार, नव्या सभागृहाचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे या सभागृहाचे काम रद्द करण्यात आले. गेले अनेक वर्षे या शौचालयांच्या दुरूस्तीसाठी निधी नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. महापौर निवासस्थान दुरूस्तीकरिताही निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. असे असतानाच घोडबंदर येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहातील दुरूस्तीच्या कामांचा सुमारे २६ लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता.