कल्याण – कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी रात्री दोन जणांनी एक तरूणीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या जवळील लॅपटॉपची बॅग हिसकावून पलायन केले आहे. ही तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणातील दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >>> वळीवामुळे भाज्या कडाडल्या, दरात २० रुपयांनी वाढ; नाशिक, पुणे जिल्ह्यांत उत्पादनात घट

ही तरूणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. ती मुंबईतील अंधेरी भागात राहते. कल्याण पूर्वेत राहत असलेल्या मित्राला त्याचा लॅपटाॅप देण्यासाठी शनिवारी ही तरुणी कल्याण पूर्व भागात आली होती. कल्याण पूर्व वाहनतळ परिसरातून जात असताना अचानक या तरूणीच्या पाठीमागून आलेल्या दोन भुरट्या चोरांनी या तरूणीजवळ पैसे किंवा त्याच्याजवळ किमती ऐवज असेल या विचारातून तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला.

हेही वाचा >>> ठाण्याच्या गडासाठी दोन्ही शिवसेनेचे रोड शो, बाईक रॅली

अचानक घडलेल्या या प्रकाराने तरूणीला काही क्षण कळलेच नाही. अंगावर ज्वलनशील पदार्थ पडल्याने या तरूणीच्या सर्वांगासह डोळ्याची आग होऊ लागली. तिला काही क्षण काय करायचे आणि काय झाले ते कळलेच नाही. डोळ्याची आग सुरू झाल्याने ती काही क्षण डोळे बंद केले. तोपर्यंत तिच्या जवळील किमती ऐवज चोरून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन जणांनी तरूणी जवळील लॅपटाॅपची पिशवी हिसकावून पळ काढला.

पादचाऱ्यांनी या तरूणीला मदत करून तिला कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी तात्काळ या तरूणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटना घडल्या ठिकाणीला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपींचा शोध सुरू केला आहे. गेल्या वर्षभरापासून कल्याण पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात पादचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करून लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. गर्दुल्ले, मद्यपी हेच प्रकार करत असल्याचे यापूर्वी पोलीस तपासात उघड झाले आहे.