लग्न करायचे तर ‘रेतीवाला नवरा’ पाहिजे हा आजवर आगरी समाजातील वधूंकडून लावला जाणारा निकष. नुकत्याच पार पडलेल्या आगरी समाजासाठीच्या ‘लगीन’ या वधुवर मेळाव्यात हा निकष मोडित काढण्यात आला. या मेळाव्यात पदवीधर आगरी तरुण मंडळींची संख्या अधिक होती. यात निम्म्याहून अधिक तरुण-तरुणी हे डॉक्टर, वकील आणि इंजिनीअर या व्यवसायाशी निगडित होते. यामुळे बांधकाम व्यवसायाकडे वळणारी ही आगरी समाजातील तरुण मंडळी आता शिक्षणातही आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
येथील अजय राजा हॉलमध्ये आगरी समाज वधू-वर सूचक मंडळाच्यावतीने पार पडलेल्या या मेळाव्याला कल्याण, डोंबिवली, ठाणे, अलिबाग, कर्जत, शहापूर, भिवंडी आणि मुंबईतून सुमारे सहाशे ज्ञाती बांधवांनी हजेरी लावली आणि यात २०० वधुवरांची नोंदणी झाली आहे. अनेकांचे विवाह जुळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून यातील ८० तरुण-तरुणींचा विवाह गाठ जुळण्याच्या मार्गावर आहे.
आठ वर्षांपासून डोंबिवलीत आगरी समाज वधू -वर मेळावा होतो; परंतु बदलापूर आणि अंबरनाथ पट्टय़ात असा मेळावा झालेला नव्हता, असे आयोजकांनी सांगितले. सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचा यापुढील मानस असून त्याचा खर्च मंडळाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.