अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंबरनाथ हे एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात आहे. केंद्र शासनाचा आयुध निर्माणी कारखाना, धरमसी मोरारजी, विम्को, के. टी. स्टील गॅरलिक, स्वस्तिक आदी मोठमोठय़ा कंपन्यांमुळे भारतभर या शहराची ख्याती होती. या कंपन्यांमध्ये नोकरीनिमित्त अंबरनाथमध्ये स्थायिक झालेल्या काही नागरिकांनी आपली वाचनाची भूक भागविण्यासाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वसंतराव कर्णिक, मथुरे, जावळे आदी तत्कालीन साहित्यप्रेमी मंडळींनी त्यात पुढाकार घेतला. १९४८ मध्ये ग्रंथालय सुरू झाले. सुरुवातीच्या काळात ही मंडळी वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके खरेदी करून आपापसात सक्र्युलेट करून घेत. त्यामुळे या ग्रंथालयास सक्र्युलेटिंग मंडळ असेच नाव दिले गेले. एकदा भारताचे पहिले अर्थमंत्री कै. चिंतामणराव देशमुख यांनी ग्रंथालयास भेट दिली. तेथील पुस्तके पाहून ते प्रभावित झाले. अंबरनाथकर साहित्यप्रेमी नागरिकांनी सुरू केलेली ही संस्था ग्रंथांचे अभिसरण करते, म्हणून त्यांनी संस्थेचे नाव ग्रंथाभिसरण ठेवावे असे सुचविले. तेव्हापासून आजतागायत ‘ग्रंथाभिसरण’ या नावाने ही संस्था ओळखली जाते.सुरुवातीला १२ वाचक सभासदांसाठी १५ मासिके खरेदी करून या वाचन संस्कृतीचा पाया घातला गेला. सध्या या ग्रंथालयात सुमारे ४१ हजारांहून अधिक ग्रंथ, निरनिराळया विषयांची मासिके, पाक्षिके, साप्ताहिके, शिवाय वेगवेगळ्या प्रकारचा वाचनीय संग्रह पाहायला मिळतो. शहरातील एक साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्व अरुण मैड ग्रंथाभिसरणचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
इतर विभाग :
कथा, कादंबऱ्या, आत्मकथन, पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेखन ग्रंथांचा संगम असलेला हा विभाग. इथे अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली पुस्तके नजरेस पडतात. अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ यांचे भारतीय सांस्कृतिक सागर हा त्यातलाच एक ग्रंथ; ज्यात अथर्ववेद, यजुर्वेद, प्रश्नोपनिषद अशा अनेक वेदांचा संग्रह पाहायला मिळतो. स्वामी शारदानंदांचे श्री रामकृष्ण लीला प्रसंग हा ग्रंथ व १८९६ मध्ये वामन दाजी ओक यांनी संकलित केलेले महाराष्ट्र कवी मोरोपंतकृत स्फुटकाव्याची प्रत ग्रंथालयात उपलब्ध आहे.
मासिके विभाग
या विभागात मराठी, िहदी, इंग्रजी अशा भाषांतील वेगवेगळ्या विषयांवरची ७५ मासिके, ११ पाक्षिके, साप्ताहिके, काही बाल मासिके पाहायला मिळतात. मासिकांमध्ये मैत्रीण, फिरकी, प्रपंच, मानिनी तसेच जत्रा हे त्रमासिक, याशिवाय इंग्रजी मासिकांमध्ये स्याव्ही, न्यू वुमेन्स, वुमेन्स एरा, सिनेलिब्स आदींचा समावेश आहे.
मान्यवर भेट
संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत अनेक नामवंत साहित्यिक, समाजसेवक इ. मान्यवरांनी ग्रंथालयाला भेट देऊन संस्थेच्या ज्ञानप्रसाराच्या कार्याची प्रशंसा केली आहे. त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर, द. मा. मिरासदार, प्रभाकर अत्रे, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, शिवाजी सावंत अशा अनेक साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी ग्रंथालयाला भेट दिली आहे.
वर्गणी
ग्रंथालयाची मासिक वर्गणी ५० रुपये, तर वार्षकि वर्गणी ६०० रुपये आहे. आजीव सभासद वर्गणी योजनेत वाचकांना एक जुने व एक नवीन पुस्तक वाचण्यास उपलब्ध होते. स्थगिती योजनेत अर्ज भरल्यास पुस्तक ग्रंथालयास जमा केल्यावर सहा महिन्यांसाठी सभासदत्व राहते.
अभ्यासिका
शहरातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन संस्थेने काही वर्षांपूर्वी अतिशय माफक दरात ग्रंथालयातच अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. गरजू व होतकरू असलेले ६० विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी ही अभ्यासिका सुरू असते.
उपक्रम :
ग्रंथालयातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून अंबरनाथमधील लेखिकांचा सत्कार केला जातो. याशिवाय साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची व्याख्यानमाला आयोजित केली जाते. संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांची भाषणे, तसेच स्पर्धा आयोजित केल्या जातात.
पुरस्कार
१९९८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार संस्थेस प्राप्त झाला आहे. याशिवाय स्थानिक साप्ताहिक आहुती व दैनिक अंबरनाथ टाइम्स यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे.
ललित, ग्रामीण, विनोदी, स्त्रीवादी, वैचारिक असे साहित्य, रोजची वर्तमानपत्रे, मासिके अतिशय साध्या मांडणीतून जतन करून ठेवलेला ग्रंथांचा ठेवा हे या ग्रंथालयाचे वेगळेपण ठरते. कार्यक्षम व तत्पर सेवा देणारा विनम्र कर्मचारी वर्ग हे संस्थेचे मोठे बलस्थान आहे.
दुर्मीळ ग्रंथसंग्रह
ग्रंथाभिसरणमध्ये अनेक दुर्मीळ पुस्तके आहेत. त्यात दिगंबर मोकाशी यांनी १९६३ मध्ये लिहिलेली ‘लामणदिवा’ ही कथा, अरिवद गोखले यांची १९६९ ची ‘मंत्रमुग्ध’ ही कादंबरी, गांधीजींचे सहकारी महादेवभाई देसाई यांनी लिहिलेले ‘बोडरेलीचा सत्याग्रह’, विजयालक्ष्मी पंडित यांनी कारागृहात असताना केलेले लेखन आदींचा समावेश आहे.
ग्रंथाभिसरण, कानसई विभाग,
अंबरनाथ (पूर्व) ४२१५०१