तापमानवाढीमुळे उत्पादन कमी; आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ
भाज्यांच्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मिरचीच्या वाढीव दरांची फोडणी सहन करावी लागणार आहे. मुंबई तसेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मिरचीच्या घाऊक दरांनी किलोमागे ७० रुपयांपर्यंत उडी घेतली आहे. ठाण्यातील किरकोळ बाजारातही हिरव्या मिरचीचे दर १२० रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे आले, कोथिंबीर, कडिपत्त्यासोबत मिळणाऱ्या हिरव्या मसाल्यातून मिरच्या गायब होऊ लागल्या आहेत. इतर भाज्यांचे दरही गेल्या पंधरवडय़ाच्या तुलनेत वाढले आहेत.
ठाणे, मुंबई, कल्याण तसेच आसपासच्या शहरांना पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ांमधून भाजीपाल्याची मोठी आयात होत असते. गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीचा मोठा फटका भाज्यांच्या उत्पादनाला बसला असून या शहरांना होणारी आवकही मंदावली आहे. उन्हाचा सर्वाधिक फटका मिरचीच्या उत्पादनावर झाला असून मुंबई, ठाण्यास होणारी आवक मंदावली आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव देशमुख यांनी दिली. एरवी या बाजारात मिरचीची ७ ते ८ टन आवक होत असे. आता ती २ ते ३ टनापर्यंत खाली आली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजी विक्रेते हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, कडिपत्ता व मिरची देत. मिरचीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हिरव्या मसाल्यामधून मिरचीला पूर्णपणे वगळले जाऊ लागले आहे, अशी माहिती किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दिली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून मिरचीसह इतरही भाज्यांच्या दराचा क्रम चढता दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी आणि कल्याणच्या घाऊक बाजारात फ्लॉवर, कोबी अशा भाज्यांच्या किमती किलोमागे क्वचितच दोन अंकी झाल्याचे चित्र होते. गेल्या महिनाभरापासून या भाज्या किलोमागे महाग होताना दिसून येत आहे. घाऊक बाजारामध्येही फ्लॉवर १७ रुपये तर कोबी १० रुपये एवढय़ा दराने विक्री केली जात आहे. किरकोळीत मात्र ४० रुपये किलो या ठरलेल्या दराने विक्री केली जात आहे.
त्याचबरोबर किरकोळ बाजारामध्ये भेंडी, फरसबी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची अशा प्रमुख भाज्या किलोमागे ६० ते ८० अशा किमतीमध्ये विकल्या जात आहेत. आवक मंदावल्याने एपीएमसीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीची भेंडी, कारली, ढोबळी मिरची किलोमागे ३० ते ४० रुपयांनी
विकली जाऊ लागली आहे. असे असताना वाशी, ठाण्यातील काही किरकोळ बाजारात हाच दर ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाज्या आणि मिरची हे एक अतूट समीकरण आहे. साधारणत: सर्वाधिक भाज्यांच्या फोडणीसाठी मिरचीचा वापर होतो. एक वेळ फोडणीतून कांदा वगळता येतो मात्र मिरची वगळणे तसे अशक्य असते. मिरची व इतर भाज्यांच्या झालेल्या भाववाढीचा मोठा फटका आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या बजेटवर होणार.
– मेघा घोलप

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green chillies are being sold at rs 120 per kg in the retail market
First published on: 06-05-2016 at 04:13 IST