Gudi Padwa 2017: डोंबिवलीत मुस्लिम बांधवांकडून स्वागतयात्रेचं स्वागत

ठाणे, कल्याणमध्येही नववर्ष स्वागतयात्रेचा जल्लोष

स्वागत नवीन वर्षाचं

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा…….संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरातल्या मराठी मनांत हा सण उत्साहाने साजरा केला जातो. आज गुढीपाडव्याचा उत्साह ठाण्यासोबत ठाण्याच्या उपनगरांमध्येही दिसला. ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमध्ये नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आल्या.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीमध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान करत तरुणाईने मोठ्या उत्साहात नववर्ष स्वागतयात्रेत सहभाग घेतला. स्वच्छ सुंदर डोंबिवली, प्रदूषण मुक्त डोंबिवली, प्लॅस्टिकमुक्त डोंबिवली असे संदेश देणारे सुमारे ५० चित्ररथ या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. ही डोंबिवलीतली १९ वी स्वागतयात्रा. यंदाच्या वर्षीची एक उल्लेखनीय बाब म्हणजे डोंबिवली पश्चिम इथे मुस्लिम बांधवांनी नववर्ष स्वागतयात्रेचं स्वागत करत या यात्रेची शान वाढवली.

स्वागतयात्रेचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत
स्वागतयात्रेचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत

सकाळी ६.३० नंतर पालखीचे भागशाळा मैदान येथे प्रस्थान झाले. भागशाळा मैदानाजवळ पालखीचे ढोल ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात स्वागत झालं आणि सकाळी ७.३० वाजता स्वागतयात्रेस सुरुवात झाली. या स्वागतयात्रेत महिलाही नऊवारी साडी नेसत त्यावर फेटा बांधून बुलेट व बाईकवर स्वार झाल्या होत्या. लेझीम, खालू बाजा, तलवारबाजी, लठबाजी अशी अनेक प्रात्यक्षिक या यात्रेत सादर करण्यात आली. स्वागतयात्रेत आसनगाव, शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवही सहभागी झाले होते. त्यांनी तारपा नृत्य सादर करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

नवीन वर्षाचा जल्लोष
नवीन वर्षाचा जल्लोष

 

ठाण्यात कौपिनेश्वर न्यासाच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील कौपिनेश्वराची पालखी काढण्यात आली ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर येथून सुरु झालेली पालखी जांभळी नाका मार्गे हरिनिवास परिसरात रवाना झाली. या पालखीत ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, खासदार राजन विचारे हे देखील सहभागी झाले होते. या वेळी तलावपाळी परिसरातील रांगो बापुजी चौकात मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

नारीशक्तीला सलाम
नारीशक्तीला सलाम

कल्याणमधल्या स्वागतयात्रेत ‘स्वच्छ सुंदर हरित कल्याण’ असं घोषवाक्य घेत जनजागृती झाली.  कल्याणमधल्या याज्ञवल्क्य संस्थेला ६० वर्ष पूर्ण झाल्याने  स्वागत यात्रेचं प्रायोजकत्व या संस्थेला देण्यात आलं होतं. सिंडिकेट चौकात नववर्षांती गुढी उभारताना तिची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, भाजप आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gudi padwa 2017 muslims welcome the swagat yatra in dombivli yatra in thane kalyan

ताज्या बातम्या