नवीन वर्ष म्हणजे केवळ भिंतीवरील कॅलेंडर अथवा पंचांग बदलणे नव्हे. उलट नूतन वर्षांप्रीत्यर्थ परंपरेची गुढी उभारतानाच त्याला काळानुरूप नव्या संकल्पनांची जोड देणे स्वागतार्ह ठरते. गुढी पाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रांमध्ये परंपरा आणि नवता यांचा असाच सुरेख संगम झालेला आढळतो. त्यातून नवनवीन सामाजिक संदेशही पसरवला जातो. हाच हेतू मनात ठेवून डोंबिवलीतील संजय आणि स्वाती जोशी यांनी सौरऊर्जेवर फिरणारी गुढी तयार केली असून त्यातून सौरऊर्जेच्या अधिकाधिक वापराचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वागत यात्रांचे पर्व सुरू झाल्यानंतर गुढीचेही अनेक प्रकार बाजारात येऊ लागले. दारासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या मोठय़ा गुढीबरोबरच कार, कार्यालयात टेबलावर ठेवता येईल अशा छोटय़ा आकाराच्या गुढय़ा बाजारात येऊ लागल्या. अशा शोभिवंत गुढय़ा भेटवस्तू म्हणून एकमेकांना देण्यात येऊ लागल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर डोंबिवलीत भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे व्यावसायिक संजय आणि स्वाती जोशी यांनी सौरऊर्जेवर स्वत:भोवती फिरणारी गुढी तयार केली आहे. सौर पॅनलद्वारे या गुढीला स्वत:भोवती फिरविता येईल, ही कल्पना स्वाती जोशी यांना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. गुढी ही नावीन्याचे प्रतीक असते. त्यामुळे सौरऊर्जेचा प्रसार करण्यासाठी ही सौरगुढी निश्चितच
उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
विजेवरही फिरणार
घराबाहेर उन्हात ठेवल्यावर ही गुढी स्वत:भोवती फिरेलच, शिवाय यात बसविलेल्या आणखी एका संयंत्रामुळे ती घरामध्ये टय़ूब अथवा एलईडी दिव्याच्या प्रकाशातही फिरू शकेल, अशी माहिती संजय जोशी यांनी दिली.