scorecardresearch

हातसडीच्या तांदळाच्या मागणीत वाढ

समाजमाध्यमांमार्फत होत असलेल्या जनजागृतीचा परिणाम

हातसडीच्या तांदळाच्या मागणीत वाढ

समाजमाध्यमांमार्फत होत असलेल्या जनजागृतीचा परिणाम

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : सदृढ आरोग्य तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हातसडीचा तांदूळ म्हणजेच ब्राऊन राइसचे आहारात सेवन करावे, असा प्रचार जोर धरू लागल्याने गेल्या काही वर्षांपासून हातसडीच्या तांदळाची बाजारात मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गटाकडून या तांदळाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला जात आहे. कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात हातसडीच्या तांदळाचे उत्पादन घेण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याचे दिसून आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पूर्वी हातसडीच्या तांदळाची कमी प्रमाणात निर्मिती करण्यात येत होती. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हातसडीचा तांदूळ हा गुणकारक मानला जातो. त्यामुळे आहारतज्ज्ञांकडून या भाताचे सेवन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. या तांदळाची माहिती तसेच त्याची वैशिष्टय़े नागरिकांना कळावीत यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून समाजमाध्यमांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर गट तयार करण्यात आले असून त्यावर या तांदळाविषयी आहारतज्ज्ञांचे मत चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून या तांदळाच्या मागणीत वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत १०० ते ११५ शेतकरी आणि शेतकरी गट जिल्ह्यातील विविध तालुक्यांत या तांदळाचे उत्पादन घेत आहेत. तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून या तांदळाची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येत आहे. तसेच काही व्यापारी वर्गाकडूनही या तांदळाची मोठी मागणी आहे. सध्या हे तांदूळ ४० ते १०० रुपये किलोने विक्री करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांत बडय़ा गृहसंकुलांमध्येही या तांदळाची थेट विक्री करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहेत.

शेतकऱ्यांसाठी तांदूळ उत्पादक गिरण्या

जिल्ह्यात या तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या काही शेतकरी तसेच शेतकरी गटांना छोटय़ा तांदूळ उत्पादक गिरण्या पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रयत्नातून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शेतकरी या यंत्रणाचा वापर करून या तांदळाची निर्मिती करत आहेत.

तांदळाची प्रक्रिया

हाताने सडलेला तसेच पॉलीश करण्यात येत नसलेल्या तांदळाला हातसडीचा तांदूळ म्हटले जाते. या तांदळावर तीन थर असतात. यावर प्रक्रिया करताना त्यावरील थर निघून जातात. या प्रक्रियेमध्ये तांदळातील प्रथिने, लोह आणि फायबरही निघून जाते. त्यानंतर पांढरा तांदूळ तयार होत असतो.

हातसडीच्या तांदळाची मागणी लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत शेतकरी गट, बचत गट, मोठे शेतकरी यांना छोटय़ा तांदूळ उत्पादक गिरण्या मोठय़ा प्रमाणात देण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून या तांदळाची निर्मिती अधिक प्रमाणात होईल. त्यासह या शेतकरी वर्गाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

अंकुश माने, कृषी अधीक्षक, ठाणे जिल्हा

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hatsadi rice demand increase due to awareness through social media zws

ताज्या बातम्या