डोंबिवलीत फेरीवाल्यांचे प्रस्थ भलतेच वाढत असून एका फेरीवाल्याने रिक्षा चालकास मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.  माझ्या धंद्यासमोर रिक्षा लावू नये, यासाठी आग्रह धरणाऱ्या फेरीवाल्याने रिक्षाचालक ऐकत नाही हे पाहून त्याला बेदम चोप दिला. या मारहाणीचा निषेध करत शुक्रवारी दुपारी रिक्षाचालकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.
महापालिकेकडून अनाधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई होत नसल्यानेच फेरिवाल्यांची दादागिरी वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षाचालकांनी दिला. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात पी अ‍ॅण्ड टी कॉलनी आणि गांधीनगरमध्ये रिक्षांची रांग लागते. येथे स्कायवॉकच्या खाली गुप्ता नामक फेरीवाला सरबत, सीडी व कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गुप्ता याने रिक्षाचालक श्यामसुंदर परब (वय ६५) यांच्यात बाचाबाची झाली. त्यांनी गुप्ताने त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना प्राथमिक उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अनाधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रिक्षाचालकांनी अनेकवेळा महापालिककेडे केली आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शुक्रवारच्या घटनेमुळे संतप्त होत रिक्षाचालक परिक्षीत पाटील, प्रमोद गुरव, भानुदास मगर, भिकण पाटील, सचिन पाटील, रुपेश पाटील यांसह अनेक रिक्षाचालकांनी डोंबिवली विभागावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली.
रिक्षाचालकांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी शांतीलाल राठोड यांची भेट घेऊन अनाधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पालिकेकडून कारवाई करण्याचे आश्वासन राठोड यांनी दिले.