कचरा उचलला जात नसल्यामुळे भाईंदर पूर्व परिसरातील नागरिकांमध्ये भीती
भाईंदर : भाईंदर पूर्व परिसरात प्रमोद महाजन कोविड केंद्रातील कचरा वेळेत उचलला जात नसल्यामुळे कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा जैविक कचरा असल्यामुळे करोनाचा प्रसार अधिक होण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यातून रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे त्यामुळे अधिकाधिक रुग्णांचा शोध घेऊन त्यांवर उपचार करण्याकरिता प्रशासनाकडून कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील प्रमोद महाजन सभागृहात राज्य शासन आणि म्हाडाच्या सहयोगाने ३६६ खाटा असलेले ‘समर्पित कोविड आरोग्य केंद्रा’चे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते परंतु दीड महिन्यातच या कोविड केंद्राच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
सध्या या कोविड केंद्रात १९६ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या देखरेखीकरिता प्रशासनाकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचारीदेखील नेमले आहेत. या रुग्णालयात दररोज उपचार सुरू असल्यामुळे जैविक कचरादेखील मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत आहे. हा कचरा वेळेत उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाचे सक्त आदेश असताना या केंद्रातील कचरा उचलला जात नसल्याचे समोर आले आहे.
कोविड केंद्राच्या भोवतालच्या परिसरात असलेल्या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत कोविड केंद्राच्या बाहेर कचऱ्याचे ढिगारे निर्माण होत असल्यामुळे त्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्राच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
या भागात अनेक नागरिक राहत असून त्यात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत हा जैव कचरा जमा करणे किती धोकादायक असू शकते यांचा अंदाज येऊ शकतो.
– विनय दुबे, स्थानिक रहिवासी
प्रशासनामार्फत जैविक कचरा उचलला जातो. हा कचरादेखील उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– संभाजी वाघमारे, उपायुक्त, वैद्यकीय विभाग