बदलापूर-अंबरनाथ भागात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरुन वाहत असून पुरसदृष्य परिस्थितीमुळे रस्ते वाहतुकीवर जोरदार परिणाम झालेला दिसतोय. काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने अजुनही विश्रांती घेतलेली नाहीये, त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड या भागात अंधारसदृष्य वातावरण झालं आहे. बदलापूरमध्ये उल्हास नदी दुथडी भरुन वाहत असून ग्रामीण भागातील कान्होर व इतर भागांमध्ये पाणी शिरलं आहे. बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठ भागात पाणी साचलं असून, अंबरनाथमध्येही काही सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. बदलापूर-टिटवाळा रस्त्यावरचा दापीवली पूल पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत लोकांना घराबाहेर न पडण्याचा संदेश दिला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उल्हास नदीच्या किनाऱ्यावर नगरपालिकेने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तैनात केलं आहे. बदलापूरमधील प्रसिद्ध कोंडेश्वर मंदिरातही पाणी शिरल्यामुळे या परिसरात पर्यटकांना जाण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain lash out badlapur and ambernath water logging at many parts ulhas river may cross danger level
First published on: 07-07-2018 at 11:22 IST