दोघे बुडाले; वीजपुरवठा खंडित, रस्ते जलमय

सतत दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने वसई-विरार शहरांत हाहाकार उडाला आहे. शहराला पाण्याने वेढले आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांना नदीचे स्वरूप येऊन वाहतूक ठप्प झाली आहे. शहराच्या विविध भागांत नागरिक अडकून पडले असून त्यांची पालिका आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या मदतीने सुटका केली जात आहे. वेगवेगळ्या घटनांत दोन जण वाहून गेले आहेत.

नालासोपारामधील ओसवाल नगरी, आचोळे, तुळिंज सेंट्रल पार्क ते नालासोपारा स्थानक परिसर पूर्णत: पाण्याखाली आहे. विरार विवा कॉलेज रोड, डोंगर पाडा रोड असल्याने आगाशी, बोळिंज, अर्नाळा हे भाग पाण्याखाली गेले आहेत. वसई पूर्वेकडील एव्हरशाइन सिटी, वसंत नगरी हा परिसर पूर्ण पाण्याखाली गेला आहे. वसई सनसिटी गास रस्ता पाण्यामुळे बंद झाला आहे. चुळणे गाव पाण्याखाली गेले आहे. विरारमधील संतनगर, तारवाडी, पिंपळवाडी, गासकोपरी, मनवेलपाडा, फुलपाडा अशा अनेक भागांना पुराचा फटका बसलेला आहे.

वसईच्या ससूनवघर सतीवली, नालासोपारा पेल्हार मार्गावर पाणी साचल्याने महामार्ग वाहतूक रोडावली आहे. तर पश्चिम रेल्वेच्या रुळावरसुद्धा पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

वसई किनाऱ्यावरील गावांत पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महापारेषणच्या वसई येथील १०० एमव्हीए उपकेंद्रात पाण्याची पातळी वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तेथील विद्युत यंत्रणा रविवारी सकाळी साडेसहापासून बंद ठेवण्यात आली. याचा फटका दीड लाखांहून अधिक वीजग्राहकांना बसल्याचे महावितरणाने सांगितले. शनिवार रात्रीपासून वसईच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. ठिकठिकाणी झाडे पडली.

३५ गावांचा संपर्क तुटला : तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तानसा नदीवरील मेढे, आंबोडे, निंबोळी, केलठण, पांढरतारा पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ३० ते ३५ गावांचा संपर्क तुटला होता. शिरवली येथे पाणी भरल्याने खासगी व सरकारी वाहने अडकून पडली होती. शारजामोरी येथे ४० ते ५० जण अडकले होते. त्यातील एक जण वाहून गेला. उर्वरित लोकांची सुटका राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने केली. पारोळ फाटा येथे वाहनचालक वाहून गेला. फुलपाडा येथील पापडिखड धरणात एक जण बुडाला.

६०० हून अधिक लोकांची सुटका

ठिकठिकाणी पावसामुळे अडकून पडलेल्या नागरिकांची पालिकेच्या अग्निशमन पथकाने सुटका केली. वाघरीपाडा आणि नवघर पूर्वेच्या मिठागरातून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. वसई पूर्वेच्या भोयदा पाडा येथे पुरात अडकलेल्या १५ जणांची सुटका करण्यात आली. विरारच्या भाताणे येथे पुरात अडकलेल्या १५ नागरिकांची पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका केली. वालीव पोलिसांनीदेखील पेल्हार खानबाग येथे पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या ट्रकमधील तिघांची क्रेनच्या साहाय्याने सुटका केली. रविवारी दिवसभरात सहाशेहून अधिक जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.