शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे बदलापूर शहरातील सखल भाग पुन्हा एकदा जलयम झाला आहे. बदलापूर पश्चिम भागाला या पावासाचा जास्त फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे या परिसरात मोठी वित्तहानी झाली होती. अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीमधून जनजीवन सावरण्याच्या आधीच पुन्हा एकदा पावसाने बदलापूरला तडाखा दिला आहे.

बदलापूर पश्चिमेच्या हेंद्रेपाडा भागात अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेकांच्या दुचाकी-चारचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास बदलापूरला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा धोका वर्तवला जात आहे.

दरम्यान सततच्या पावसामुळे बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.