ठाणे जिल्ह्य़ाला पावसाने झोडपले

कळव्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू 

कळव्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू 

ठाणे, मुंबई : मुसळधार पावसाने सलग तिसऱ्या दिवशी संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ाला झोडपून काढले. गृहसंकुले, बैठय़ा वसाहतींमध्ये पाणी साचल्याने आणि रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर धुवाधार पावसामुळे जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत घडलेल्या पाच दुर्घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सोमवारी पावसाची संततधार होती, परंतु जोर मात्र कमी होता.

कळवा भागातील घोलाईनगर या डोंगरवस्ती भागातील घरांवर सोमवारी दुपारी दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील आहेत. या दुर्घटनेनंतर महापालिकेने त्या परिसरातील १०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले.

अतिवृष्टीमुळे बहुतेक सर्व रस्ते जलमय झाले. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल या शहरांतील वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जाणारा शीळफाटा मार्ग पाण्याखाली गेल्याने तो वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला. जिल्ह्य़ातील सर्व मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबईत सोमवारी पावसाची संततधार होती. मुंबईच्या पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात एक भिंत कोसळल्याची घटना घडली. शहरात ५, पूर्व उपनगरात ४ व पश्चिम उपनगरात दोन झाडे कोसळली. मुलुंड पूर्व येथे झाड पडून जखमी झालेल्या एका व्यक्तीला हिरामुंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात आणि पूर्व उपनगरात तीन ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहर आणि उपनगरातील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.

ठाणे जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत रविवार सायंकाळपासून घडलेल्या पाच दुर्घटनांमध्ये सात जणांचा बळी गेला. खाडीतील पाण्याच्या प्रवाहात दोन जण वाहून गेले असून ते अद्याप बेपत्ता आहेत. ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवलीतील काहीनागरिकांचे अन्यत्र सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावे लागले.

ठाणे, नौपाडा, वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. नौपाडय़ातील भांजेवाडी, चिखलवाडी, वंदना सिनेमागृह, भास्कर कॉलनी या परिसरातील बैठय़ा चाळी आणि संकुलांच्या परिसरात गुडघाभर पाणी होते. वृंदावन सोसायटी परिसरातही अशीच अवस्था होती. खारेगाव, कोळीवाडा, मुंब्रा, घोडबंदर भागात दोन ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या. मासुंदा तलाव ओसंडून वाहू लागल्याने त्यातील मासे रस्त्यावर आले होते. या भागात नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

दिवा परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. कळव्यातील न्यु शिवाजीनगरमध्ये कंबरे इतके पाणी साचल्यामुळे येथील नागरिकांना बोटीतून प्रवास करावा लागला. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि भिवंडी शहरातील अनेक भाग जलमय झाले. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.

उल्हास नदीकाठावर असलेली कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप आणि कांबा या ठिकाणच्या नव्या इमारतींच्या तळमजल्यांवर पाणी साचले. वालधुनी नदीचा प्रवाह वाढल्याने शिवमंदिराकडे जाणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि वालधुनीच्या प्रवाहामुळे मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. अंबरनाथमधील चिंचवली भागातील एका शेतकऱ्याची तीन गुरे वाहून गेली. तर, मुंब्रा -शीळफाटा भागातही बकरे वाहून गेले.

मुंबईत संततधार

मुंबई : सलग दोन दिवस धुवाधार वृष्टीचा अनुभव घेतल्यानंतर मुंबईकरांनी सोमवारी दिवसभर सुखावह संततधार अनुभवली. सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता राम मंदिर येथे २०३.५, कांदिवली येथे १२७.९६, विक्रोळी येथे १४०.९५, दहिसर येथे १६१.४६ मिमी पावसाची नोंद झाली. तुलनेने शहर भागात कमी पाऊस झाला.

चार दिवस मुसळधारेचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पुढील चार दिवस काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १ जूनपासून १९ जुलैला सकाळी ८.३० वाजेपर्यंत कु लाबा येथे १३३२.४ आणि सांताक्रूझ येथे १८८१.४ मिमी पाऊस नोंदवला गेला.

पाच दुर्घटनांत सातजण दगावले

रविवार सायंकाळपासून ठाणे जिल्ह्य़ात वेगवेगळ्या ठिकाणी पाच दुर्घटना घडल्या. त्यातील कळवा येथील घोलाईनगरमध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. भिवंडी येथील चाविंद्र भागातील नदीत वाहून गेलेल्या जुमेद अन्सारी आणि उल्हासनगर येथे नाल्यात पडलेल्या रुद्र गुप्ता या दोघांचा मृत्यू झाला आहे. शहापूर येथील भारंगी नदीत सुर्या राजपूत (२६) आणि डोंबिवली येथील गणेश घाट भागात एक तरुण वाहून गेला असून या त्यांचा शोध सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rains lashed thane district zws