सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडांची पडझड, पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटेपर्यंत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. तर काही ठिकाणी वृक्ष तसेच संरक्षक भिंत पडल्याच्या घटना घडल्या. तसेच रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु होती. मात्र, सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर अनेक भागात साचलेले पाणी ओसरून वाहतूक सुरळीतपणे सुरु झाली. तर डोंबिवलीत पावसामुळे बेस्ट आणि एसटीच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या अनेकांना बसथांब्यावरून घरी परतावे लागले. तसेच जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात मंगळवार रात्री मुसळधार पाऊस सुरु झाला. पहाटेपर्यंत सतत हा पाऊस सुरुच होता. ठाणे महापालिका क्षेत्रात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. गायमुख, मानपाडा, डि-मार्ट, वंदना, वृंदावन, आंबेडकर रोड, लोकमान्यनगर लाकडी पुल, आनंद पार्क, ऋतुपार्क, पातलीपाडा, ओवळा, कळवा सह्य़ाद्री सोसायटी यासह इतर सखल भागात पाणी साचले होते. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या भागांमधील पाणी ओसरले. गायमुख, डि-मार्ट तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली या ठिकाणी पाणी साचल्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहतुक संथगतीने सुरु होती. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर या भागांमधील पाणी ओसरले आणि त्यानंतर या भागातील वाहतुक सुरळीतपणे सुरु झाली. अनेक ठिकाणी वृक्ष वाहनांवर पडले. त्यात वाहनांचे नुकसान झाले. तर ओवळा भागात ६ ते ७ फुट उंचीची संरक्षक भिंत कोसळली असून त्यात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.

कल्याण -डोंबिवली शहरातही अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचले होते. डोंबिवली स्थानक परिसर, कोपर भागातील चाळ परिसर, चिकणघर, राजाराम पाटील नगर, नेतीवली टेकडी, पत्रीपूल परिसर, कल्याण -शीळफाटा रोडवरील सोनारपाडा या भागातील सखल भागात पाणी साचले होते. डोंबिवलीत पावसामुळे बेस्ट आणि एसटीच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या अनेकांना बसथांब्यावरून घरी परतावे लागले. भिवंडीतही जोरदार पाऊस झाला आहे. तर बदलापूर आणि अंबरनाथ शहरात मंगळवारी रात्रभर पाऊस कोसळला. बुधवार सकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. उल्हासनगर शहरातही पावसाची संततधार पहायला मिळाली. मुरबाड आणि शहापूर तालुक्यातही मंगळवार सायंकाळनंतर चांगला पाऊस झाला. बारवी आणि भातसा धरणाच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. असाच पाऊस झाल्यास धरणक्षेत्रात पाण्याची वाढ होईल अशी आशा आहे.