धर्मगुरूंच्या मृत्यूला रुग्णालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संतप्त जमावाने मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाची मोडतोड केली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला शांत केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
धर्मगुरू मौलाना एहसान हैदर जव्वादी यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना सुरुवातीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु या रुग्णालयाने वोक्हार्ट रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने त्यांना त्या ठिकाणी नेण्यात आले. रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांची प्राणज्योत मालवली.
मौलानांच्या मृत्यूमुळे या ठिकाणी जमलेल्या जमावात एकच संतापाची लाट उसळली. रुग्णालयाने सुमारे दीड तास मौलाना यांच्यावर उपचारच केले नाहीत. जे उपचार झाले, तेही डॉक्टरांकडून झाले नाहीत, असा आरोप संतप्त जमावाने केला आणि रुग्णालयातील कक्षाच्या काचा तसेच रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या एका वाहनाच्या काचा फोडल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांची मोठी कुमक तसेच दंगल नियंत्रण पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाईल तसेच उपचारादरम्यान निष्काळजीपणा झाला आहे का याची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी या वेळी दिले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
रुग्णालय व्यवस्थापनाने मात्र झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. मौलाना रुग्णालयात दाखल होताच त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यक ते सर्व उपचार करून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी केलेले सर्व प्रयत्न रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतील, असा खुलासा रुग्णालय व्यवस्थापनाने केला आहे.