दिव्यातील पक्षाची सर्व कार्यालये अनधिकृत इमारतींमध्ये

दिव्यात विकासाच्या नावाने अंधार असल्याची ओरड करत येथील बजबजपुरीवर प्रहार करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिवा परिसरातील दौऱ्यात उद्घाटन केलेली सर्व पक्ष कार्यालये बेकायदा इमारतीत थाटली गेल्याची माहिती पुढे आली आहे. नियोजनाच्या नावाने तीनतेरा वाजलेले मध्य रेल्वे मार्गावरील दिवा हे उपनगर बेकायदा बांधकामांचे आगार मानले जाते. येथील विस्कटलेल्या नियोजनावर नेमके बोट ठेवत राज यांनी जानेवारी महिन्यात संबंधितांचा समाचार घेऊ, असा इशारा शुक्रवारच्या दौऱ्यादरम्यान दिला होता; परंतु त्यांच्या पक्षाचीच कार्यालये बेकायदा इमारतींमध्ये असल्याचे उघड झाल्याने मनसेप्रमुखांच्या विधानांवर टीका होऊ लागली आहे.

ठाणे महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत दिवा आणि आसपासच्या परिसरात तब्बल ११ जागांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे एरवी कुणीच्या खिजगणतीतही नसणाऱ्या दिवा परिसराला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून सर्वच पक्षांचे बडे नेते या भागात दौरे काढू लागले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शुक्रवारची सायंकाळ खास दिव्यासाठी राखून ठेवली होती. येथील दिवा महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी येथे आलेले राज यांनी सायंकाळी हातोहात गणेश नगर, खर्डी गाव, दिवा-शीळ रोड, मुंब्रा देवी कॉलनी या भागांतील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटनही करून टाकले. मात्र ही सर्व कार्यालये अनधिकृत इमल्यांमध्ये उभी असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. अख्खे दिवा अशाच बेकायदेशीर इमारतींमध्ये उभे असल्याने आम्ही कार्यालय थाटायचे तरी कुठे, असा बचाव आता मनसेच्या नेत्यांनी सुरू केला असून या कार्यालयात बसून राज यांचे मावळे दिव्यात नेमका कुठे प्रकाश पाडणार, असा सवाल आता दिवेकरांमधून उपस्थित  होत आहे.

खर्डी गाव जनसंपर्क कार्यालय, दिवा-शीळ रोड, खर्डी गाव, दिवा-शीळ स्थानक रस्ता येथील राजगड जनसंपर्क कार्यालय, मुंब्रा देवी कॉलनी येथील मुंब्रा देवी गड जनसंपर्क कार्यालय, गणेश नगर येथील दातिवली गड जनसंपर्क कार्यालयांचे राज यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मात्र दिवा शहरात कोणतीच इमारत अधिकृत नसल्याचे सांगत मनसे विभाग प्रमुख तुषार पाटील यांनी मनसेचीच नव्हे, तर सर्वच पक्षांतील कार्यालये ही अनधिकृत इमारतीत असल्याचे नमूद केले.

दिवा शहरच अनधिकृत आहे. यामुळे आमच्या पक्षाने काहीही वेगळे केलेले नाही. शिवाय पूर्वी दिवा-शीळ स्थानक रस्त्यावर मनसेचे जनसंपर्क कार्यालय होते. मात्र ते शैलेश पाटील यांचे होते. शैलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नवीन जनसंपर्क कार्यालये सुरू करावी लागली.’’  – तुषार पाटील, मनसे विभाग प्रमुख

नेत्यांसोबत कार्यालयेही सेनेत

पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत दिव्यातील दोन प्रभागांमधून मनसेचे शैलेश पाटील आणि श्रीमती मुंडे या निवडून आल्या होत्या. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दिवा परिसरात तेव्हा रमेश पाटील हे मनसेचे आमदार होते. त्यामुळे विधानसभेची हवा तेव्हा दिव्यात दिसली. यंदा मात्र येथून शिवसेनेचे सुभाष भोईर आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकंदर हवा ओळखून शैलेश पाटील यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पाटील कंपनीने सुरू केलेली मनसेची कार्यालये एव्हाना शिवसेनेच्या शाखेत परावर्तित झाली असून यामुळे मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना नव्याने पक्षाची बांधणी या भागात करावी लागत आहे.