इंडियन सनबीम हे लायकेनिडे कुळातील म्हणजे ज्यांना ब्लू फुलपाखरे म्हणून ओळखले जाते, त्या कुळामधील साधारण मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. जवळपास संपूर्ण भारतभर आणि त्याचबरोबर शेजारील श्रीलंका, ब्रह्मदेश आणि त्यापुढील प्रदेशातही हे फुलपाखरू सापडते.
या फुलपाखरांमध्ये नर आणि मादी फुलपाखरांचे रंग निरनिराळे असतात. नरांच्या पंखांची वरची बाजू ही अगदी तांबूस म्हणजे लख्ख घासलेल्या तांब्याच्या भांडय़ांसारखी असते तर मादी फुलपाखरांच्या पंखांची वरची बाजू गडद तपकिरी रंगाची असते आणि त्यावर मध्यभागी मोठे पांढरे धब्बे असतात.नर आणि मादी दोन्हींच्या पंखांची खालची बाजू चकचकीत पांढऱ्या रंगाची असते. त्यावर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे अगदी बारीक ठिपके असतात.या फुलपाखराची मादी गुंज, गरुडवेल, करंज यांसारख्या झाडांवर अंडी घालते. बाहेर येणाऱ्या सुरवंटाचा रंग पानाच्या रंगाशी इतका मिळताजुळता असतो की सुरवंट वेगळा ओळखताच येत नाही. या फुलपाखरांच्या कोषामधून अतिशय बारीक आवाज येत असतो हा आवाज कसा काय येतो याविषयी अजून संशोधन होणे आहे.
हे फुलपाखरू फुलावर बसून पंखांची उघडझाप करते, तेव्हा त्याच्या चमकदार पांढऱ्या पंखांमधून अचानक तांबडा रंग डोकावतो हे बघताना ढगामधून हलकेच बाहेर येणाऱ्या सूर्यकिरणांचीच आठवण येते. त्यामुळे त्याचे नांव इंडियन सनबीम असे पडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian sunbeam butterfly
First published on: 17-08-2016 at 00:37 IST