परस्परविरोधी परिपत्रकांमुळे गोंधळ; वापराबाबत सार्वत्रिक उदासिनता

सध्या सर्वत्र ‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशीची चर्चा असली तरी स्वतंत्र भारताने कालगणनेसाठी स्वीकारलेल्या सौर दिनदर्शिकेची मात्र उपेक्षा कायम आहे.

यंदा शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीला जून महिन्यात शिक्षण संचालनालयाने एका परिपत्रकान्वये शालेय कारभारात सौर दिनदर्शिकेचा वापर करण्याचे आदेश दिल्याने त्याआधारे ‘सौर दिनांक’चा प्रसार करणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र गेल्याच महिन्यात (१९ सप्टेंबर) शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून शाळांना पाठविण्यात आलेल्या नव्या नोंदवहीच्या नमुन्यात ‘सौर दिनांक’ नोंदविण्यासाठी रकानाच नसल्याने संबंधित कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. ‘नासा’च्या संकेतस्थळावरही भारताची कालगणना म्हणून सौर दिनदर्शिकेचा उल्लेख आहे, मात्र आपल्याकडे मात्र त्याचा वापराबाबत सार्वत्रिक उदासिनता आहे.

राष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलेली अनेक मानके आणि परिणामे स्वीकारण्यात आली. त्यांचा दैनंदिन जीवनात वापरही सुरू झाला.

शालेय स्तरावर सौर दिनदर्शिकेचा वापर सुरू केल्यास सौर दिनांक व्यवहारात येऊ शकेल. जून महिन्यात काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे ती प्रक्रिया सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात शालेय नोंदीत सुसुत्रता यावी म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या नमुना पत्रकात ‘सौर दिनांक’साठी रकानाच नाही. त्यातून शासकीय पातळीवरच सौर दिनदर्शिकेविषयीचा गोंधळ  दिसून येतो. शासनाने तातडीने सुधारित परिपत्रक काढून विद्यार्थ्यांंच्या नोंदवहीत त्यांची सौर जन्म दिनांक नोंदविण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे या दिनदर्शिकेचा प्रसार होण्यास मदत होईल, असे मत खगोल अभ्यासक हेमंत मोने यांनी व्यक्त केले आहे.

अशी आहे सौर दिनदर्शिका

डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार २२ मार्च १९५६ पासून सौर दिनदर्शिका स्वीकारण्यात आली. या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला दिवस १ चैत्र १८७९ असा होता. मार्गशीर्षचा अपवाद वगळता या सौर दिनदर्शिकेतील इतर ११ महिन्यांची नावे शालिवाहन कालगणनेतील महिन्यांप्रमाणेच चैत्र ते फाल्गुन अशी आहेत. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण म्हटले जाते. लीप वर्ष वगळता या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला दिवस २२ मार्च असतो. लीप वर्षांत  २१ जूनला सौर वर्ष सुरू होते. वैशाख ते भाद्रपद या सलग पाच महिन्यांचे ३१ दिवस तर उर्वरित सात महिन्यांचे प्रत्येकी ३० दिवस असतात. फक्त लीप वर्षांत चैत्र महिना ३१ दिवसांचा असतो.