scorecardresearch

मुंबई साप्ताहिकी- भालचंद्र पेंढारकर यांच्यावरील ‘ध्यासयात्रा’ संगीतमय कार्यक्रम

एक वैशिष्टय़ म्हणजे राम मराठे ‘जय जय गौरीशंकर’, ‘रंगात रंगला श्रीरंग’ अशी गाणी सादर करणार आहेत.

मुंबई साप्ताहिकी- भालचंद्र पेंढारकर यांच्यावरील ‘ध्यासयात्रा’ संगीतमय कार्यक्रम

मराठी संगीत रंगभूमीवरील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आणि ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ या संस्थेचे सर्वेसर्वा भालचंद्र पेंढारकर यांनी मराठी संगीत नाटकाच्या पुनरुज्जीवनासाठी कष्ट घेतले. निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, अभिनेता अशा अनेक भूमिकांद्वारे रंगभूमीची त्यांनी सेवा केली. भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर यांच्याशी व पर्यायाने ललित कलादर्श संस्थेशी संबंधित नाटकांचा व नाटय़पदांचा सुरेल मागोवा ‘ध्यासयात्रा : एक अद्भुत नाटय़प्रवास’ या संगीतमय कार्यक्रमाद्वारे घेतला जाणार आहे. अदित निर्मित व वैखरी या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेला हा वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम होणार आहे. अपर्णा हेगडे, मनीषा मंडपे-हर्षे, निमिष कैकाडे, संदीप राऊत यांच्यासह धनंजय पुराणिक, मकरंद कुंडले, राजेंद्र भावे हे कलावंत सहभागी होणार असून या विशेष कार्यक्रमाला गायक रामदास कामत आणि मुकुंद राम मराठे उपस्थित राहणार आहेत. ‘बदलता बॅकड्रॉप’ आणि ‘रमा रमण श्रीरंग’ या शीर्षकाच्या अनोखी ध्वनिचित्रफीत पाहण्याची संधी रसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे. भालचंद्र पेंढारकरांनी अजरामर केलेली नाटय़पदे ऐकण्याबरोबरच संबंधित नाटकांतील कलावंतांची दुर्मीळ छायाचित्रे, तत्कालीन नाटकांच्या जाहिराती रसिकांना पाहायला मिळतील. पुष्कर मुंडले आणि शैलेश देशपांडे यांच्या निवेदनातून भालचंद्र पेंढारकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू कार्यक्रमातून उलगडणार आहेत. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे राम मराठे ‘जय जय गौरीशंकर’, ‘रंगात रंगला श्रीरंग’ अशी गाणी सादर करणार आहेत.

शनिवार, २ जानेवारी दुपारी ४.३० वाजता

साहित्य संघ मंदिर, चर्नी रोड स्थानकाजवळ, केळेवाडी, गिरगाव

‘मुंबई मेरी जान’ चित्र प्रदर्शन

‘जिवाची मुंबई’ करायला मुंबई-भेटीवर येणाऱ्या लोकांबरोबरच अनेक चित्रकार, छायाचित्रकार यांसारख्या कलावंतांना मुंबई शहराने नेहमीच भुरळ घातली आहे. अशीच भुरळ नगरस्थित चित्रकार सचिन भानगडे यांना मुंबई शहराने घातली. त्यांनी मुंबई शहर हाच विषय चित्रांसाठी निवडला आहे. ‘मुंबई मेरी जान’ हे प्रदर्शन सध्या भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात चित्रकाराने एक निश्चित संकल्पना मनाशी ठरवून मुंबई शहरातील विविध ठिकाणांचे दर्शन घडविण्याबरोबरच इथले वातावरण, इमारती  टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

रविवार, ३ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७

आर्टिस्ट सेंटर कला दालन, अ‍ॅडॉर हाऊस, काळा घोडा

‘रूरल अमेरिका’

अमेरिका म्हटले की सर्वसामान्यपणे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन इत्यादी महत्त्वाच्या शहरांची छायाचित्रे आपण नेहमी पाहतो. त्याचबरोबर अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसची छायाचित्रे नियमितपणे पाहायला मिळतात. परंतु अमेरिकेच्या ग्रामीण भागांतील सौंदर्य, तिथले वातावरण टिपणारी छायाचित्रे सहसा पाहण्याची संधी ‘रुरल अमेरिका’ या छायाचित्रांच्या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली आहे. जे. बी. जॅक्सन यांच्या ‘लॅण्डस्केप थिअरी’चा वापर छायाचित्रकार श्रीपाद जोगळेकर यांनी या प्रदर्शनातील छायाचित्रांमध्ये केला असून २००८ सालापासून त्यांनी क्लिक केलेली छायाचित्रे पाहायला मिळतील. याद्वारे अमेरिकेच्या ग्रामीण भागांतील संस्कृती, पर्यावरण, निसर्गसौंदर्य याची झलक पाहायला मिळेल.

४ ते १३ जानेवारी दरम्यान सकाळी ११ ते ७

पिरामल कला दालन, एनसीपीए संकुल, नरिमन पॉइण्ट

‘पार्ले कट्टा’मध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर

सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडियन रिसर्चचे माजी संचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर येत्या शनिवारी ‘पार्ले कट्टा’ उपक्रमात श्रोत्यांच्या भेटीला येणार आहेत. पार्ले कट्टा उपक्रमातील हा ५१ वा कार्यक्रम असून रसिक श्रोत्यांच्या वतीने डॉ. माशेलकर यांच्याशी डॉ. अनुया पालकर संवाद साधणार आहेत. सुरुवातीला मुक्त व्यासपीठ अंतर्गत ‘आयुर्वेद हिवाळ्यासाठी’ या विषयावर वैद्य राजीव कानिटकर माहिती देतील. या शनिवारी शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. सर्वाना विनाशुल्क प्रवेश आहे.

शनिवार, २ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजता

साठे उद्यान, मालवीय पार्क रस्ता चौक, शिवसेना शाखेसमोर, विलेपार्ले पूर्व

रविवारी चेंबूरमध्ये शास्त्रीय गायन

जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका सानिया पाटणकर यांनी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे शिकून घराण्याची गायकी आत्मसात केली आहे. या घराण्याच्या उदयोन्मुख गायिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन ऐकण्याची संधी शास्त्रीय संगीतप्रेमींना रविवारी मिळणार आहे. सर्व संगीतप्रेमींना प्रवेश खुला आहे.

शनिवार, २ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजता

बालविकास संघ सभागृह, चेंबूर

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या