कल्याण-डोंबिवली शहरालगतच्या २७ गावांना मूलभूत पायाभूत सुविधा कशा मिळतील, याचा सर्वांगीण विचार करून या गावांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.  या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर कल्याणमध्ये एक बैठक घेण्यात येईल. या बैठकीच्या माध्यमातून या भागातील नागरी प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
श्रीगणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष स्वागतयात्रेला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. यावेळी राज्यात नागरीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न, नैसर्गिक आपत्तीने उभी केलेली आव्हाने, कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील रस्ते, पाणी, समूह विकास योजना, झोपडपट्टी निर्मूलन योजनांवर त्यांनी भाष्य केले.
२७ गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवसेना नेत्यांच्या आग्रहावरून ही गावे पालिकेत टाकण्यात येत असल्याचे संघर्ष समितीचे मत झाले आहे.या विषयावर अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.
आव्हानांचा सामना करीत आपले सरकार पुढे जात आहे. रस्ते, वाहतूक, पाणी अशा अनेक नागरी समस्या सोडवण्यासाठी गतिमानतेने निर्णय घेतले जात आहेत. यापूर्वीचे काँग्रेस सरकार निर्णय घेत नव्हते. हा निर्णय न घेण्याचा गुन्हा आमचे सरकार करीत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला लगावला.
प्रदूषण केवळ औद्योगिकीकरणातून होत नसून अनेक महापालिकांमधील सांडपाणी थेट खाडी, नदीपात्रात सोडण्यात येते. हे प्रदूषण संपवण्यासाठी घनकचऱ्याच्या विषयावर स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून तात्काळ निर्णय घेण्याचे पालिकांना कळवण्यात आले आहे. यापुढे पालिकांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या योजना राबवल्या जातील. त्यांनाच शासन तंत्रज्ञान, निधी उपलब्ध करून देईल. चौदाव्या वित्त आयोगातून कल्याण-डोंबिवली शहराला वाटा मिळेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे स्वागत करू शकतो अशी दृष्टी, एक ठेवा डोंबिवलीने मराठी माणसाला दिला आहे. कधी एकत्र न येणाऱ्या चार विचारवंतांच्या खांद्यावर एका समंजस विचारवंताने समजूतदारपणाचा हात ठेवल्याने या शहरात विचारवंतांचा हा मेळावा भरत आहे. नववर्षांची ही गुढी एकत्ररीत्या वाहिली जात आहे, असे गौरवोद्गगार मुख्यमंत्र्यांनी काढले.
राज्यासमोरील आव्हाने सोडवण्यासाठी ‘शक्ती दे’ अशी मागणी आपण श्रीगणेशाला केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली शहरांच्या नागरी समस्या सोडवण्याची मागणी करणारे निवेदन गणेश मंदिरातर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. कार्यक्रमाला महापौर कल्याणी पाटील, मंदिर विश्वस्त जयकृष्ण सप्तर्षी, अलका मुतालिक, दीपाली काळे, खासदार कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, सुभाष भोईर, उपमहापौर राहुल दामले, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, आयुक्त मधुकर अर्दड आदी उपस्थित होते.