भूक लागली असेल तर पंचपक्वानांची चित्रे पाहून पोट भरत नाही. त्यासाठी चटणी-भाकरी का होईना काहीतरी खायला हवे. दुर्दैवाने आपणच विणलेल्या सुखस्वप्नांच्या धाग्यात गुरफटलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाला त्याची जाणीव असल्याचे दिसत नाही. ठाणेकरांच्या आनंदाची मात्रा वाढविण्यासाठी मोठय़ा प्रकल्पांची आखणी करण्यात मश्गूल असलेल्या महापालिका प्रशासनाला त्यांची प्राथमिकता काय हे एकतर कळत नाही किंवा कळते पण वळत नाही..

ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात शहरवासीयांचा आनंद निर्देशांक वाढविण्यासाठी नऊ वेगवेगळ्या प्रकल्पांची घोषणा केली. जगभरात नागरिकांचा आनंद निर्देशांक वाढावा यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. जागतिक स्तरावर राबवण्यात येणारे उपक्रम ठाणेकरांसाठी राबविण्याच्या उद्देशाने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोटय़वधींची तजवीज करण्यात येत आहे. ठाणेकरांची सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक जीवनशैली वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अभ्यास करणे, शास्त्रीय पद्धती समजून घेणे असे प्रयत्न सुरूअसल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, आध्यात्मिक आरोग्य, मानसिक शांती अनुभवता यावी यासाठी महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी सुरुवातीला पाच कोटी तर टप्प्याटप्प्याने १०० कोटी रुपये खर्च करण्याचा महापालिकेचा बेत आहे. शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या जीवनात रंग भरावेत यासाठी झोपडय़ा रंगविण्याचा प्रकल्पही या आनंददायी प्रकल्पांचा भाग असल्याचे दावेही सध्या महापालिका वर्तुळात केले जात आहेत. मात्र या गोड गुलाबी घोषणांच्या पलीकडे सर्वसामान्य ठाणेकरांच्या दररोजच्या जगण्यात खराखुरा आनंद यावा यासाठी महापालिका काही करते आहे का, हा खरा प्रश्न आहे. शहरातील नाक्यानाक्यांवर भरणारे बेकायदा आठवडी बाजार, प्रवाशाची धमनी समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसणारे फेरीवाले, बेशिस्त वाहतूक नियोजन, आधीच अडगळीत सापडलेल्या मासुंदा तलावाभोवती रस्ता अडवून उभे राहणारे घोडागाडी चालक, घोडबंदरचे प्रशस्त सेवा रस्ते गिळंकृत करणारे व्यावसायिक असे वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नांची तड ज्या महापालिकेला लावता येत नाही, त्याच संस्थेकडून शहरवासीयांचा आनंद निर्देशांक वाढविण्यासाठी कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प आखले जातात हे खरे तर हास्यास्पद आहे.

साधारण तीन, साडेतीन वर्षांपूर्वीचा काळ असावा. ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच संजीव जयस्वाल यांनी आपल्या पहिल्याच स्थानक दौऱ्यात फेरीवाले, बेकायदा टपऱ्या साफ करण्याचा विडा उचलत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर काही महिने रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त होता. जयस्वाल यांची ही धडाडी अधूनमधून सतत दिसत राहिली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेचे संपूर्ण प्रशासन स्वमग्न अवस्थेत असल्यासारखे वावरू लागले आहेत. आपण जे करतोय, तेच ठाणेकरांचे हिताचे असा ठाम समज प्रशासकीय प्रमुखानेच करून घेतल्याने संपूर्ण प्रशासन कोटय़वधी रुपयांच्या विकासकामांच्या स्वप्नात मग्न दिसू लागले आहे. ठाण्यात तीन वर्षांहून अधिक काळ आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने जयस्वाल यांनी सध्या बडय़ा विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. ही अप्रत्यक्ष मुदतवाढ जणू त्यासाठीच मिळाली असल्याचे आयुक्तांना पक्के ठाऊक असावे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ठाणेकरांच्या समस्यांकडे ढुंकूनही बघण्यास सध्या त्यांना वेळ नसावा. ज्या धडाकेबाज मोहिमांमुळे आपण प्रसिद्धीच्या झोतात आलो, ठाणेकरांची वाहवा मिळवू शकलो त्याच कामगिरीकडे जयस्वाल यांचे होणारे दुर्लक्ष अस्वस्थ करणारे आहे.

रेल्वे स्थानकाचे दुखणे कधी संपणार? 

गेली अनेक वर्षे कोपरी परिसरात ठाण्यासाठी विस्तारित स्थानक उभारण्याची चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल, तेव्हा येईल मात्र सद्य:स्थितीतील स्थानक आणि तेथे पोहोचण्याची व्यवस्था सुलभ होईल, अशी कोणतीही व्यवस्था येथील राजकीय नेते आणि प्रशासकीय यंत्रणांना उभी करता आलेली नाही हे वास्तव आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी कमी व्हावी यासाठी कोटयवधी रुपये खर्च करून सॅटीससारखा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. तांत्रिक आघाडीवर हा प्रकल्प पुरता फसला असताना मानवी अतिक्रमणांमुळे सॅटीस ओलांडून स्थानकाकडे कूच करताना ठाणेकर प्रवाशांची अक्षरश: दमछाक होते. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांचा तुटवडा, रिक्षाचालकांची मग्रुरी, पुरेशा वाहनतळांचा अभाव, बेकायदा पार्किंगचा वेढा यासारख्या अतिक्रमणातून स्थानकात पोहोचल्यावर गर्दीने तुडुंब ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांची काय अवस्था होत असेल हा विचारच मुळी अस्वस्थ करणारा ठरतो. स्थानक परिसरात वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमजबजावणी व्हावी यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना सोबत घेत या भागात ठरावीक अशा नियमांची आखणी केली. सुरुवातीच्या काळात या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. ठरावीक थांब्यांवर रिक्षा मिळत असत. शिवाय बेशिस्त पार्किंग बंद झाल्याने प्रवासी कमालीचे सुखावले होते. आता मात्र या भागातील चित्र नेमके उलट आहे. संपूर्ण स्थानक परिसरात पूर्वीपेक्षाही विदारक चित्र दिसू लागले आहे. जयस्वाल लांब राहिले, महापालिकेचे स्थानिक पातळीवरील अधिकारीही या भागात फिरकत नाहीत असे चित्र आहे.

कुणाचाही पायपोस कुणात नाही, अशी परिस्थिती असताना जयस्वाल मात्र ठाणेकरांना जलवाहतूक, खाडीकिनारी चौपाटय़ा, नवे रस्ते, उड्डाणपूल तसेच ठाणेकरांचा ‘आनंद’ वाढविणाऱ्या लहानमोठय़ा प्रकल्पांच्या आखणीत मग्न झाले आहेत. झोपडपट्टय़ांमध्ये सुविधांचा एकूणच आनंद असताना आयुक्तांना तेथील कच्ची-पक्की घरे रंगविण्यात अधिक रस दिसतो आहे. ही घरे रंगविण्यासाठी बिल्डर, ठेकेदार, काही ठिकाणी नगरसेवकांकडून ‘रसद’ उभी केली जात आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतागृहात पाणी नाही, रस्त्यांची वाताहत आहे, तिथे ही रंगरंगोटी नेमकी कशासाठी आणि कुणासाठी याचे उत्तर अधिकाऱ्यांनाच ठाऊकअसावे. मात्र ठाणेकरांच्या रोजच्या जगण्यातले अडथळे दूर करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या या बडय़ा बाता शहरवासीयांसाठी खरोखर आनंददायी ठरतील का, हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.