कल्याण: अनेक वर्ष आदिवासी, अवघड डोंगर दुर्गम क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी आपली एक दिवस शहरी भागात सेवाज्येष्ठतेप्रमाणे बदली होईल या अपेक्षेवर होते. आरोग्य विभागाने आदिवासी, दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची एक यादी प्रसिध्द केली. ही यादी प्रसिध्द केल्यानंतर ती तात्काळ रद्द करुन सर्वसाधारण कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करुन आदिवासी, दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागाने अन्याय केला आहे, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी आरोग्य मंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी आदिवासी, दुर्गम, अवघड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये नोकरी करतात. या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर ओळख नसल्याने हे कर्मचारी वर्षानुवर्ष आदिवासी भागात रुग्ण सेवा देतात. सेवाज्येष्ठतेप्रमाणे एक दिवस आपली बदली होईल या अपेक्षेवर हे कर्मचारी आहेत. वर्षानुवर्ष आदिवासी भागात काम करणाऱ्यांना शहरी भागात बदली देणे आणि शहरी कर्मचाऱ्यांना तेथे नियुक्त्या देणे, असा नियम आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील पंधरा दिवसापूर्वी आरोग्य विभागाने आदिवासी दुर्गम भागातील बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या हरकती सूचना मागविल्या. आदिवासी दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांच्या प्राधान्य क्रमानुसार अंतीम सेवा ज्येष्ठता यादी पुणे येथील आरोग्य विभागाचे संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्द झाली. ही यादी कोणतेही कारण न देता मागे घेऊन बदलीस पात्र सर्वसाधारण सेवा ज्येष्ठता यादी संचालक पुणे यांनी प्रसिध्द केली. आरोग्य विभागाकडील या यादी मागे घेणे, नवीन यादी प्रसिध्द करण्याच्या प्रकारामुळे आदिवासी, जोखीमयुक्त भागातील कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे, असे अध्यक्ष गाडे यांनी सांगितले.

सर्वसाधारण ज्येष्ठता यादीमुळे आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता मागे पडली आहे. शहरी भागातील कर्मचारी आपल्या सोयीप्रमाणे तालुका, शहरी, निमशहरी, रेल्वे स्थानक भागातील आरोग्य केंद्रांमध्ये आपली वर्णी लावून घेतील. या जागांवर लक्ष ठेऊन असलेला आदिवासी, दुर्गम भागातील आरोग्य कर्मचारी पुन्हा आदिवासी भागात खितपत पडणार आहे, असा प्रश्न गाडे यांनी केला आहे. शहरी भागातील कर्मचारी वजन वापरुन शहरी भागातच योग्य ठिकाणी नियुक्ती मिळविण्यात या नवीन बदली प्रकारामुले यशस्वी झाला आहे. अशा बदली प्रकारामुळे शहरी भागातील कर्मचारी आदिवासी, जोखीमयुक्त भागात रुग्ण सेवेसाठी जाणार नाही अशी व्यवस्थाच आरोग्य विभाग करत असल्याची टीका आदिवासी भागातील आरोग्य कर्मचारी करत आहेत. या बदल्या होत असताना आरोग्य विभागाकडून काही कर्मचाऱ्यांना तुम्हाला बदली हवी आहे ना, अशाप्रकारे संपर्क साधण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जून महिन्यात वेळेत बदल्या झाल्यातर कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी जाऊन नवीन घर भाड्याने घेणे, मुलांचा शाळा प्रवेश निश्चित करणे ही कामे करायची असतात. आरोग्य विभागाने आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना निमशहरी भागात पदस्थापना द्यावी, अशी मागणी गाडे यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाचे संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांना संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injustice to tribal area employees in transfers of state health workers ysh
First published on: 02-06-2023 at 17:08 IST