scorecardresearch

उल्हास नदी पूररेषेची पाहणी

बदलापूर शहरातून जाणाऱ्या उल्हास नदीची पूररेषा सदोष असल्याची टीका होत असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बुधवारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन यांनी बदलापुरात भेट देत आक्षेप असलेल्या ठिकाणांची पाहणी केली.

पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून चुकीच्या नोंदीची उजळणी

बदलापूर:  बदलापूर शहरातून जाणाऱ्या उल्हास नदीची पूररेषा सदोष असल्याची टीका होत असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बुधवारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन यांनी बदलापुरात भेट देत आक्षेप असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यामुळे पूररेषेची पुर्नआखणी केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांत बदलापूर शहराला तीनदा पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे पूररेषा जाहीर करण्याची मागणी वाढत होती. अशातच जून २०२० मध्ये जलसंपदा विभागाने उल्हास नदीची पूररेषा जाहीर केली. बदलापूर शहरातील सध्या रहिवासी वसाहती असलेला मोठा भाग या पूररेषेत आला, तर सुमारे ४०० एकर जमीन पूररेषेत गेली. त्याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसला होता. ज्या ठिकाणी पुराचे पाणी कधीच गेले नव्हते, अशा ठिकाणच्या नोंदीही या पूररेषेदरम्यान केल्या गेल्याचा दावा शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी केला होता. यासंबंधी त्यांनी नगर विकास तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली समस्या मांडली. शिंदे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. त्यावेळी दोन्ही मंत्र्यांनी पूररेषेचा पुनर्विचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांना आक्षेप असलेल्या भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवार, २६ जानेवारी रोजी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन यांनी बदलापूर शहरातील अशा ठिकाणांची पाहणी केली. यावेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, पालिकेचे नगर रचनाकार सुदर्शन तोडणकर आणि अभियंते उपस्थित होते. शहरात ज्या ठिकाणी पुराचे पाणी कधीही जाऊ शकत नाही ती ठिकाणे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दाखवण्यात आली. या पाहणीनंतर जलसंपदा विभाग पुरेशी पुर्नआखणी करेल अशी आशा शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली.

शहरात अशी सुमारे १५ ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पुराचे पाणी कधीच जात नाही. त्या ठिकाणांची माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली आहे. 

– सुदर्शन तोडणकर, नगर रचनाकार, कुळगाव बदलापूर नगर पालिका.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inspection ulhas river basin ysh

ताज्या बातम्या