कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या साहित्यात शहरातील अनेक समाजकंटक, भाई, दादा आणि काही पालिका कर्मचाऱ्यांनी ‘व्याजी’ पैशाची गुंतवणूक केली आहे. फेरीवाल्यांना साहित्य आणण्यासाठी व्याजाने पैसे द्यायचे आणि ते पैसे दर आठवडय़ाने दामदुपटीने वसूल करायचे, असा काही समाजकंटकांचा वर्षांनुवर्षांचा धंदा आहे. व्याजाने मिळालेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी व धंदा सुरू राहण्यासाठी फेरीवाले रेल्वे स्थानक भागातून हटत नसल्याची धक्कादायक माहिती एका फेरीवाल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.

दर आठवडय़ाला हप्ता व व्याजी पैशाची रक्कम फेरीवाल्यांकडून घरपोच होत असल्याने हे समाजकंटक फेरीवाल्यांना भरभक्कम पाठिंबा देऊन त्यांना बेधडक रस्ते, पदपथांवर व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे सूत्राने सांगितले.

समाजकंटकांप्रमाणे कामगारांनीही पाच ते दहा फेरीवाल्यांचे गट करून त्यांना व्याजाने पैसे देण्याचा उद्योग सुरू केला. पालिकेचा पगार, त्यात फेरीवाल्यांकडून व्याजी रकमेतून मिळणारी रक्कम, त्यामुळे फेरीवाला हटाव पथकातील अनेक पथकप्रमुख, कामगार ‘लक्ष्मीपुत्र’ झाले आहेत. या कामगारांची प्रशासनाने अनेक वेळा विविध विभागांत बदली केली तरी, हे कामगार फिरून फिरून प्रशासनात उलटापालट करून फेरीवाल्यांशी संधान ठेवून आपला व्याजी धंदा चालू ठेवत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील अनेक कामगार फेरीवाल्यांना व्याजाने पैसे देतात. त्यांच्याकडून हप्त्याबरोबर आपली हक्काची रक्कम वसूल करतात, असे फेरीवाल्यांमधील सूत्राने सांगितले.

कल्याणमधील फेरीवाला हटाव पथकात वर्षांनुवर्षे काम करणारा एक कामगार डोंबिवली  प्रभागात स्थलांतरित करण्यात आला आहे. या कामगाराला फेरीवाला पथकात न ठेवता त्याला प्रशासनाने कार्यालयात शिपायाचे काम दिले आहे. त्यामुळे हा कामगार कमालीचा अस्वस्थ झाला आहे. तसेच एक कामगार कल्याण पूर्वेत पालिका रुग्णालयात कार्यरत आहे. हा कामगार नियमित डोंबिवलीत संध्याकाळी फेरीवाला हटाव पथकाचा कामगार म्हणून वसुलीसाठी हजर असतो, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

काही नगरसेवकही काही कर्मचाऱ्यांना दटावणी करून दर महिन्याला लाखोंचा दौलतजादा देण्याची मागणी करीत आहेत. काही नगरसेवक फेरीवाल्यांच्या दलालांना हाताशी धरून आपली उपजीविका करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबतची माहिती या नगरसेवकांच्या वरिष्ठांना देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

आयुक्तांच्या धसक्याने फेरीवाल्यांवर कारवाई

डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यात कामगारांकडून टाळाटाळ केली जात असल्याने, आयुक्त ई. रवींद्रन स्वत: गेले दोन दिवस डोंबिवलीत रात्री आठ वाजल्यानंतर येत आहेत. आयुक्तांच्या आगमनामुळे फेरीवाला हटाव पथकातील कामगार, अधिकारी कमालीचे धास्तावले आहेत. संध्याकाळी सहा वाजता फेरीवाल्यांना हटविण्याचे निमित्त करून घरी पळणारे कामगार, कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून रात्री अकरा वाजेपर्यंत डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करीत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे रहिवासी कमालीचे खूश झाले आहेत. आयुक्तांनी दररोज डोंबिवलीत यावे म्हणजे आम्हाला किमान पाय मोकळे करून चालता येईल, अशा प्रतिक्रिया पादचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.