हेमांगिनी पाटील , ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पूर्वी दलालांनी गजबजलेले असायचे, पण परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या एका आदेशामुळे कार्यालयातून दलाल हद्दपार झाले आहेत. त्यामुळे आता दलालांशिवाय थेट कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची कामे कशा पद्धतीने सुरू आहेत आणि दलालामार्फत येणारी कामे कशी रोखली जात आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाण्याच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याशी केलेली बातचीत.
* दलालांच्या हद्दपारीमुळे दैनंदिन कामकाजावर काही परिणाम झाला आहे का?
दलालांमार्फत येणारे एकही काम स्वीकारले जात नाही आणि कार्यालयात दलाल येऊ नयेत म्हणून आपण अनेक उपाययोजना केल्या आहेत. दलालबंदीचा दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसून कार्यालयातील कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहे. उलट दलालबंदीमुळे नागरिक थेट कार्यालयात येऊ लागले असून त्यांची कामे दलालांविना कमी वेळात होऊ लागली आहेत. कार्यालयातील कामकाज आणि एखाद्या कामाची प्रक्रिया याविषयी नागरिकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे काही गैरसमज होतात, पण त्यांना त्याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांचे समाधान होते, तसेच दलालांविना कामे लवकर मार्गी लागत असल्याने अनेक नागरिक आभार व्यक्त करतात.  
* कार्यालयातील कामकाज, वेगवेगळे अर्ज या विषयी नागरिक अनभिज्ञ असतात, त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या आहेत?
प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना, नोंदणी, क्रमांक तसेच अन्य कामे करण्यात येत असून या कामांसाठी वेगवेगळे अर्ज आहेत. कोणत्या कामासाठी कोणता अर्ज भरायचा आणि कोणत्या खिडकीमध्ये तो जमा करायचा, याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कार्यालय परिसरात मोठ-मोठे फलक लावण्यात आले असून त्यावर ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी कार्यालयात ‘अभ्यागत मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कक्षातील संबंधित अधिकारी नागरिकांना मार्गदर्शन करीत असतात. तसेच त्यांच्या शंकेचे निरसन करतात.
* शहरातील बोगस रिक्षांवर आपण कशा प्रकारे कारवाई करता?
रिक्षा या वाहनाचे १६ वर्षे पूर्ण झाली की, त्याची कार्यालयात नोंद करण्यात येते. या जुन्या रिक्षाचे १३ ते १६ तुकडे करण्यात येतात आणि ते भंगारात काढण्यात येतात. यामुळे बोगस रिक्षा शहरात येण्याची शक्यता कमी आहे. यापूर्वी अशा प्रकारे कारवाई होत नव्हती. यामुळे बोगस रिक्षा शहरात असण्याची शक्यता असू शकते. मात्र, या रिक्षांवरही वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते.
* शाळेच्या बसचे अपघात होऊ नयेत यासाठी बसचालकांवर कशा प्रकारे कारवाई केली जाते?
वेगमर्यादा यंत्रणा, विद्यार्थ्यांच्या देखरेखसाठी महिला, आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्रणा आदी शाळेच्या बसमध्ये असल्या पाहिजेत. त्यासाठी आपण शाळेच्या बसचालकांना सूचना देतो, तसेच भरारी पथकामार्फत तपासणी सुरू असते. विशेष म्हणजे, शाळेचा ‘ना-हरकत दाखला’ असेल तरच आपण शाळेच्या बसला प्रमाणपत्र देतो. मात्र, अनेक शाळा ना-हरकत प्रमाणपत्र देत नाहीत. यामुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळेने घ्यायला हवी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘ना-हरकत’ दाखला दिला पाहिजे.
* रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे जनजागृती
करता?
यंदा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांसाठी ‘ताणतणाव’ या विषय निवडला होता. यामध्ये वाहनचालकांमधील ताणतणाव दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आले. तज्ज्ञांमार्फत अवजड वाहनचालकांना तसेच एसटी बसचालकांना तणावमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले. तणावामुळे अनेकदा अपघात होतात, ते होऊ नयेत म्हणून हा विषय निवडण्यात आला. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
 नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of deputy regional transport officer thane hemangini patil
First published on: 03-02-2015 at 12:07 IST