महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे नियमांकडे दुर्लक्ष

ठाणे : वृक्षरोपणानंतर रोपांना आधार मिळावा आणि काही काळ त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी महापालिकेमार्फत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळय़ा वेळेवर काढल्या जात नसल्याने अनेक वृक्षांची वाढ खुंटू लागल्याच्या तक्रारी पयावरणप्रेमींकडून केल्या जात आहेत. या जाळय़ा झाडांची वाढ झाल्यानंतर काढाव्यात असा कायदा आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ठाणे शहरातील पदपथ तसेच रस्त्यालगत लावण्यात आलेल्या विविध वृक्षांचे संवर्धन योग्य पद्धतीने करण्यात महापालिका वृक्ष प्राधिकरणाला पुरेसे यश येत नसल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. पदपथ तसेच रस्त्यालगत लागवड करण्यात येत असलेल्या वृक्षांना मातीचा आधार कमी मिळतो. त्यामुळे या वृक्षांची वाढ चांगली व्हावी यासाठी वृक्षरोपण करताना त्याच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळी लावली जाते. वृक्षाची वाढ झाल्यानंतर ही जाळी काढावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होते आणि ही जाळी वृक्षांमध्ये रुतत जाते. परिणामी, झाडांची वाढही खुंटली जाते. झाडाची वाढ झाल्यानंतर लोखंडी जाळी काढून टाकावी, असे वृक्ष संगोपन कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

ठाणे शहरातील नौपाडा, वागळे इस्टेट, तीन हात नाका, काजूवाडी, रामचंद्रनगर, नितीन जंक्शन, पाचपाखाडी, खोपट, चंदनवाडी, चरई, टेंभी नाका, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, दमानी इस्टेट, हरिनिवास रस्ता, घंटाळी चौक, उथळसर अशा विविध भागांतील शेकडो झाडांच्या भोवतालची लोखंडी जाळी अद्याप काढण्यात आली नसल्याची माहिती वृक्षप्रेमी अजित डफळे यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. लोखंडी जाळय़ांच्या गंजलेल्या तसेच तुटलेल्या पट्टय़ा झाडांना तसेच पादचाऱ्यांनाही जखमी करत आहेत. या जाळय़ांमध्ये अनेक जण कचरा, गुटख्याच्या पुडय़ा तसेच निर्माल्य टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे जाळी कापण्याचे गॅसकटर तसेच गॅसकटर अॉपरेटर उपलब्ध नसल्यामुळे हे काम रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील झाडांभोवती लावण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी जाळय़ा काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून बऱ्यापैकी जाळय़ा काढण्यात आल्या आहेत. या महिन्याभरात शहरातील सर्वच झाडांभोवतीच्या लोखंडी जाळय़ा काढण्याचे काम पूर्ण होईल.

मारुती खोडके, उपायुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग, ठाणे महापालिका