गर्दीमुळे स्थानकातून प्रवाशांना चढणे कठीण; कारशेडमधून निघणाऱ्या लोकलमधून कळवावासीयांचा प्रवास

कर्जत-कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडय़ांमध्ये चढायला मिळत नसल्याने दिवा स्थानकातील प्रवाशांनी केलेल्या उग्र आंदोलनाला आता दोन वर्षे पूर्ण होत असतानाच, असाच उद्रेक मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकात धुमसत आहे. आधीच्या स्थानकांतून आधीच खचाखच भरून आलेल्या लोकलमध्ये कळव्यातील प्रवाशांना चढणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे येथील बहुतांश प्रवासी सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी कळवा कारशेडमधून ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या रिकाम्या लोकल गाडय़ांमध्ये चढू लागले आहेत. या गाडय़ा कळवा स्थानकाजवळील फाटकाच्या ठिकाणी संथ होताच लोकल पकडण्याची जीवघेणी कसरत कळव्याचे प्रवासी करू लागले आहेत. हे दु:साहस एखाद्याच्या जिवावर बेतल्यास कळव्यातील प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कल्याण, डोंबिवली किंवा त्यापलीकडून येणाऱ्या लोकल गाडय़ांमध्ये जागा मिळत नसल्याने दोन वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातच दिव्यातील प्रवाशांनी हिंसक आंदोलन केले होते. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकात सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे दिव्यातील प्रवाशांचा संताप थंडावला असला तरी आंदोलन केल्यावरच सुविधा मिळतील, असा संदेश अन्य स्थानकांतील प्रवाशांपर्यंत पोहोचला आहे.

कल्याण-बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने सगळ्या गाडय़ा भरून येत असल्यामुळे या गाडय़ांमध्ये कळवा-मुंब््यातील प्रवाशांना शिरायला जागा मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी कळवा कारशेडमधून ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलगाडय़ांमध्ये शिरून तेथून पुढचा प्रवास करतात. कारशेडमधून गाडी बाहेर पडत असताना फाटकाच्या परिसरात सिग्नल लागल्यावर थांबलेल्या गाडय़ांमध्ये शिरण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडते. अवघ्या काही क्षणांसाठी थांबलेली ही गाडी सुरू झाल्यानंतर वेग वाढल्यास चढणारे प्रवासी थेट रुळावर पडत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. या प्रकारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून किमान या भागात होम प्लॅटफॉर्म उभा करावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याची भावना प्रवासी व्यक्त करू लागले आहेत.

तिकीट खिडक्या नसल्यामुळे उत्पन्न कमी

कळवा स्थानकातून दोन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असताना त्यांच्यासाठी पूर्व आणि पश्चिमेला तिकीट घर उभारण्यात आले आहे. परंतु त्यामध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे पूर्वेकडील तिकीटघरातील एक खिडकी लवकर बंद होते. तर पश्चिमेकडील तीनपैकी केवळ दोनच खिडक्या सुरू असतात. रात्री खिडक्या लवकर बंद होत असल्यामुळे इच्छा असून प्रवाशांना तिकीट काढता येत नाही आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन कळव्याला सुविधा कमी मिळत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

दररोज एक ते दीड लाख प्रवासी कळवा स्थानकातून प्रवास करतात. यातील बहुतांश प्रवासी ठाणे स्थानकातून तिकीट काढत असल्यामुळे त्यांची नोंद ठाणेकर प्रवासी म्हणून होते. त्यामुळे ठाणे स्थानकाला जास्त सुविधा पुरवण्यात येतात. उलट कळवा स्थानकातील उत्पन्न कमी असल्याचे दाखवून तेथे सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन हात आखडता घेते. हा अन्याय असून याविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे.

सिद्धेश देसाई, कळवा-पारसिक प्रवासी संघटना