कल्याण-डोंबिवली शहरांचे परीघक्षेत्र नागरी वस्तीने जसे वाढू लागले त्या प्रमाणात गुन्हेगारीही वाढू लागली आहे. आठवडाभरापूर्वी नयन जैन या चिमुरडय़ाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याने शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहेच, शिवाय पालकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरणही निर्माण झाले आहे. नयनचे अपहरण व हत्या करणारे जैन कुटुंबीयांच्या परिचितांपैकीच होते. मात्र, कल्याण डोंबिवली परिसरातील बेकायदा बांधकामे, नियोजन धाब्यावर बसवून वाढणाऱ्या वस्त्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाणे पोलिसांसाठी येता काळ आव्हानात्मक म्हणावा लागेल.

दहा वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली परिसरात विशेष करून डोंबिवलीत हमखास दर महिन्याला लहान मुलांना खंडणीसाठी पळवून नेण्याचे प्रकार व्हायचे. त्यावेळी या सगळ्या गुन्ह्यांचा, गुन्हेगारीचा तावूनसुलाखून अभ्यास केलेले पोलीस अधिकारी या परिसरात कार्यरत होते. या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दत्ता घुले (निवृत्त), सुनील पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या अधिकाऱ्यांना तात्कालीन ठाणे पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते, उपायुक्त सुरेश अहिरेंसारखे अनुभवी अधिकारी मार्गदर्शन करायचे. अशी घटना घडताच खबऱ्यांना कामाला लावले जायचे. वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात येऊन ठाण मांडून बसायचे. अपहृतांना सहीसलामत सोडवण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न केले जायचे आणि त्यात पोलीस बऱ्यापैकी यशस्वी व्हायचे.

कल्याणमधील नयन जैन या चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर पुन्हा गुन्हेगारी प्रवृती डोके वर काढू लागली आहे. नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने एक मोठा वर्ग बाहेरच्या प्रांतामधून दररोज कल्याण रेल्वे स्थानकात धडकत असतो. रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत विविध प्रांतामधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा येत असतात. या गाडय़ांमधून कल्याण रेल्वे स्थानकात दररोज ज्या पद्धतीने तरुणांचे लोंढे उतरतात ते पाहून थक्क व्हायला होते. पूर्वी इतकी रोजगाराची साधने या शहर परिसरात राहिलेली नाहीत. यापूर्वी आपल्या प्रांतामधून जामानिमा घेऊन येणारा तरुण शहरातील रस्त्याच्या कोपऱ्यावर, झोपडपट्टीत राहून परीट, लॉण्ड्री, पिठाची चक्की, रिक्षा, लघुउद्योगांमध्ये कष्ट, मेहनत करून आपले शहरातील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करायचा. आता आहे तेच उद्योग जिवंत राहतात की नाही अशी परिस्थिती आहे. डोंबिवलीतील प्रीमिअर, शहाड परिसरातील मोठय़ा कंपन्या बंद पडल्याने या कंपन्यांवर तग धरून असलेले डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील काही लघुउद्योग बंद पडले आहेत.

रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना कायमचे हटवून हा परिसर पादचारी, रहदारीसाठी खुला करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे पूर्वीसारखा सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर धंदा करण्याचा प्रकार बंद होणार आहे. त्यामुळे शहरात जे नवीन वेगळ्या भागातून लोंढे येत आहेत. त्यांना नक्की कोठे आणि कोणते काम मिळणार आहे, हा सवाल मागे उरतोच. हाताला कामच नाही तर मग ही तरुणाई गुन्हेगारीकडे तर वळणार नाही ना, असा प्रश्न आता पोलिसांनाही सतावू लागला आहे.

सध्या डोंबिवली परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रार कसलीही असो तक्रारदाराला प्रथम बाहेरचा रस्ता दाखविण्याचे उद्योग सुरू आहेत. पोलीस ठाण्यातील वरिष्ठांसह जर सामान्य पोलीस आपल्याशी अशी कृती करीत असतील तर कशाला त्यांना साहाय्य करायचे या विचाराप्रत सामान्य नागरिक येतो. शहरात असे अनेक गट, संघटना आहेत की ज्या स्वत:हून पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहेत. ईगल ब्रिगेड, दक्षता समितीसारखे गट तर स्वत: पोलिसांची भूमिका अनेक प्रसंगात पार पाडत आहेत. असे असताना स्थानिक पोलिसांनी आपला चिडचिडेपणा कमी करणे आवश्यक आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास, चोऱ्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला पाहिजे. शहर गुन्हेगारीमुक्त ठेवण्यासाठी अनेक रहिवासी सोसायटीला सीसी टीव्ही कॅमेरे बसवून घेत आहेत. महापालिकेने पुढाकार घेऊन शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे ६५० हून सीसी टीव्ही कॅमेरे शहरातील मोक्याच्या ठिकाणी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक प्रकरणात नागरिकांना स्थानिक पोलीस ठाण्याकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही असा अनुभव आहे. अशा घटना खडकपाडा, विष्णुनगर, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. सर्वसामान्य, पोलीस आणि शहरातील विचारी मंडळी एकजीवाने राहत असतील तर नक्कीच हे प्रकार रोखले जातात, हे यापूर्वीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

येणाऱ्या काळात लोंढय़ाचे प्रमाण वाढणार आहेच. त्यात त्यांच्या हातांना काम नसेल. लोंढय़ामधील काही जण हातांना काम नाही म्हटल्यावर चोरीच्या क्षेत्रात उतरणार आहेत. शहराच्या अवतीभवतीच्या बेकायदा चाळी चोरटय़ांना निवांत आश्रयस्थानासाठी आहेतच. हा सगळा येणारा आव्हानात्मक काळ विचारात घेऊन सर्वसामान्य व्यक्ती अलीकडे अधिकच जागरूक झाला आहे. गणवेशधारी पोलिसांनी सर्वसामान्य काय म्हणतोय, तो काय सांगतोय एवढे जरी ऐकून घेतले तरी शहरातील गुन्ह्य़ांचे प्रमाण कितीतरी प्रमाणात कमी होऊ शकेल.