कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी व्यापारी, व्यावसायिक वर्गातील उमेदवार मोठय़ा संख्येने निवडणूक रिंगणात आहेत. या व्यापारी उमेदवारांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही म्हणून प्रतिज्ञापत्रे निवडणूक अधिकाऱ्यांना दिली आहेत. तरीही, अनेक व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी’ची पालिकेची लाखो रुपयांची थकबाकी थकवली आहे. किती व्यापारी उमेदवारांनी ‘एलबीटी’ थकवला आहे, अशी माहिती एका जाणकाराने पालिकेकडे मागवल्याने खळबळ उडाली.
पालिका हद्दीतील १२ ते १३ हजार व्यापाऱ्यांनी ‘स्थानिक संस्था कर’ (एलबीटी) भरण्यासाठी पालिककडे नोंदणी केली होती. यामधील पाच ते सहा हजार व्यापारीच दरवर्षी नियमित ‘एलबीटी’ भरणा करीत होते. उर्वरित बहुतांशी व्यापाऱ्यांनी एलबीटी न भरण्याकडेच कल ठेवला. त्यामुळे पालिकेला दरवर्षी महसुलात सुमारे ४० ते ५० कोटीचा तोटा सहन करावा लागत होता. एलबीटी बंद झाला असला तरी, थकबाकी ही कर चुकवेगिरीच आहे, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
पालिका निवडणुकीसाठी ज्या व्यापारी, व्यावसायिक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘एलबीटी’ कर भरला आहे का, तसेच थकबाकी किती आहे, याची माहिती घेऊन संबंधित व्यापारी उमेदवारांना कायद्याचा बडगा दाखवावा. या कारवाईमुळे पालिकेची मागील तीन वर्षांपासून व्यापाऱ्यांनी थकवलेली ‘एलबीटी’ची रक्कम वसूल करणे शक्य होईल, असे या जाणकाराने पालिका प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.