सार्वजनिक, व्यक्तिगतरित्या कार्यक्रम न करण्याचे आवाहन

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या पाश्र्वभूमीवर पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच दोन दिवसांवर आलेल्या होळी आणि धूलिवंदन उत्सवानिमित्त नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असून या पाश्र्वभूमीवर होळी आणि धूलिवंदनाचा कार्यक्रम नागरिकांनी सार्वजनिक किंवा व्यक्तिगतरीत्या साजरा करू नये, असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायद्याने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. शहरात दररोज सरासरी आठशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना तसेच निर्बंध घालण्यात येत आहेत. गर्दी करू नका, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. त्यातच होळी आणि धूलिवंदन उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहेत. हे उत्सव साजरे करण्यासाठी नागरिक सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा संख्येने एकत्र येतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

करोना महामारीचे भयावह संकट पाहता अशा प्रकारचा कार्यक्रम गर्दी जमवून, सार्वजनिक किंवा व्यक्तिगतरीत्या साजरा करणे प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही. त्यामुळे शहरातील रहिवासी, उत्सवी मंडळे यांनी या वेळी होळी आणि धूलिवंदनाचा उत्सव सार्वजनिक, खासगी, व्यक्तिगतरीत्या साजरा करू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याविरोधात साथ नियंत्रण कायद्याने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.