वीस वर्षांतील सर्व प्रकरणांची चौकशी
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अनेक ठिकाणी पालिकेचे गाळे आहेत. गटई कामगारांच्या टपऱ्या, अपंगांचे स्टॉल्स आहेत. पालिकेच्या मालमत्ता विभागाने गेल्या वीस वर्षांत या गाळे, टपऱ्यांमध्ये प्रचंड अनागोंदी केली आहे. या संदर्भातचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भातील गेल्या वीस वर्षांतील सगळी प्रकरणे बाहेर काढण्याचे मालमत्ता विभागाला आदेश दिल्याचे समजते.
या आदेशामुळे मालमत्ता विभागात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि तेथून गेलेल्या काही अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. बहुतेक गाळे, स्टॉल्स, टपऱ्या या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या सगेसोयरे, नातेवाईकांच्या नावाने चालविण्यास घेतले आहेत. त्या माध्यमातून पालिकेला एक पैशाचाही महसूल मिळत नाही. गाळे, टपऱ्यांवर ताबा असलेले काही अधिकारी लेखा परीक्षण विभागाला या गाळे, टपऱ्यांची माहिती दहा वर्षांपासून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शहरातील काही ठिकाणचे गाळे काही आजी-माजी नगरसेवकांच्या नियंत्रणाखाली असल्याची अनेक वर्षांपासूनची चर्चा आहे. त्यामुळे गाळे, टपऱ्या हा विषय पालिकेत कधीच चर्चेला आला नाही.
पालिकेचा लेखापरीक्षण विभाग दहा वर्षांपासून या गाळे, टपऱ्यांचे करारनामे, त्यांचे नूतनीकरण, त्यांच्या वसुलीची माहिती मालमत्ता विभागाकडे मागत आहे. पण ती माहिती देण्यास मालमत्ता विभागाकडून नेहमीच टाळाटाळ केली जात आहे. ‘लोकसत्ता ठाणे’ने हा गोंधळ उघड करताच, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गाळे, टपऱ्यांची गंभीर दखल घेतली आहे.