डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळून केडीएमटीच्या बस सोडण्याचा प्रस्ताव

डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात सतत कारवाई करूनही फेरीवाले बधत नाहीत, हे लक्षात आल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांनी आता एक नवी शक्कल लढवली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील विक्रेत्यांना रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणे कठीण व्हावे, यासाठी आयुक्तांनी पूर्वेकडील परिसरातून परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) मिनी बस सोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या योजनेचा फेरीवाल्यांवर कितपत परिणाम होईल, याबाबत साशंकता असली तरी, ही बससेवा डोंबिवलीतील प्रवाशांना फायद्याची ठरण्याची चिन्हे आहेत.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांमुळे हा सगळा परिसर बकाल झाला आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ई.रवींद्रन यांनी ही दोन्ही स्थानके फेरीवालामुक्त केली जातील, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र ही घोषणा हवेत विरली. नवे आयुक्त वेलारासू यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी काही उपाय राबविता येतील का यावर विचार सुरू केला आहे. महापालिकेतर्फे रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर सतत कारवाई केली जाते; तरीही फेरीवाले तेवढय़ा पुरते गायब होऊन पुन्हा रस्ते अडवून व्यवसाय करीत आहेत. या फेरीवाल्यांच्या बंदोबस्तासाठी प्रायोगिक तत्त्वावर खासगी एजन्सीचे बाऊन्सर नेमण्याचा विचार प्रशासन करीत आहे. फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला दिले होते. त्या आदेशाची प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही.

दरम्यान, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले हटवायचे असतील तर या भागातील रस्त्यावर तातडीने केडीएमटीची मिनी बस सेवा सुरू करावी.बसचा मार्ग कसा असेल याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी केडीएमटीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून केडीएमटी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने या बसचे परिचलन करण्यात येईल, अशी माहिती केडीएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशी धावेल बस

* मानपाडा रस्त्याने येणाऱ्या बस थेट इंदिरा चौकात येतात. काही वेळा या बस गणेश कोल्ड्रिंक्स, बालभवन, रामकृष्ण हॉटेल ते केळकर रस्त्याने इंदिरा चौकात येतात. केळकर रस्त्याने बस आली की या रस्त्यावर रिक्षा वाहनतळ असल्याने वाहतूक कोंडी होते.

* नवीन प्रस्तावात मानपाडा रस्त्याने येणारी बस गणेश कोल्ड्रिंक्स-बालभवन- बोडस सभागृह-डॉमिनोज ते टंडन रस्त्याला उजवे वळण घेईल. तेथून ही बस केळकर रस्ता- वाहतूक कार्यालय- डॉ. रॉथ रस्ता (रेल्वे स्थानक समांतर रस्ता)- स्कायवॉक खालून पाटकर रस्त्याने कॅनरा बँकेच्या दिशेने इंदिरा चौकात येईल. तेथून ही बस इच्छित स्थळी जाईल.

* या बसला रामनगर रेल्वे तिकीट खिडकी किंवा रॉथ रस्त्यावरील जुने भाजप कार्यालयाजवळ उतरणाऱ्या रेल्वे जिन्याजवळ थांबा देता येईल का, याचा विचार केडीएमटी व वाहतूक विभागाचे अधिकारी संयुक्तपणे करणार आहेत. या थांब्यामुळे प्रवाशांना थेट इंदिरा चौकापर्यंत धाव घेण्याची गरज लागणार नाही.

* वाहतूक विभागाने केडीएमटी बसच्या परिचलनाला परवानगी दिली की केडीएमटीची मिनी बस डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून सुरू होणार आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यासाठी या भागातून केडीएमटीची मिनी बससेवा सुरू केली तर फरक पडू शकतो. ही बससेवा सुरू करण्यासाठी आयुक्तांच्या आदेशावरून महाव्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण झाले आहे. बस सुरू करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाला सादर करण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर बससेवा सुरू होईल.

संदीप भोसले, आगार व्यवस्थापक, केडीएमटी