एखादा प्रकल्प उभारण्यापूर्वी त्याची नियोजनबद्ध आखणी आणि अभ्यास न केल्यास कसा फटका बसतो, याचे ढळढळीत उदाहरण ठाणे महानगरपालिकेने दाखवून दिले आहे. कळवा व मुंब्रा रेल्वेस्थानकांदरम्यान खारेगाव येथे रेल्वे रुळांवर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक जमीन ताब्यात न घेतल्यामुळे उड्डाणपुलाच्या उभारणीस विलंब झालाच; शिवाय विलंबामुळे या उड्डाणपुलाचा खर्च १५ कोटींवरून २४ कोटींवर पोहोचला आहे.
मध्य रेल्वेच्या कळवा आणि मुंब्रा या रेल्वे स्थानकांदरम्यान खारेगाव परिसरात रेल्वेचे फाटक आहे. खारेगाव परिसरात वाढत्या लोकवस्तीमुळे या भागात वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. रेतीबंदर, पारसिक, खारेगाव, आतकोनेश्वरनगर, आंबेडकरनगर परिसरातील रहिवाशांना कळव्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडल्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी येथील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीस वारंवार खोळंबा होत असतो. या पाश्र्वभूमीवर या ठिकाणी भागीदारी तत्त्वावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रेल्वे विभाग आणि ठाणे महानगरपालिकेने घेतला. रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे काम रेल्वे, तर बाहेरील जोडरस्त्याचे काम महापालिकेने करायचेही ठरवण्यात आले. त्याचे सविस्तर आराखडे मंजूर झाल्यानंतर रेल्वे विभागाकडून पुलाचे कामही सुरू करण्यात आले.
या कामासाठी २०१०-११च्या दरसुचीनुसार १५ कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार होता. पालिकेच्या २०१२-१३च्या अर्थसंकल्पात यासाठी ५० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र, पालिकेच्या वाटय़ाला आलेल्या जोडरस्त्याची जागा कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहे. ही  जागा ताब्यात न घेताच पालिकेने पुलाचा अंदाजित खर्च मांडला होता. त्यामुळे जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जोडरस्त्याचे काम रखडणार आहे. दरम्यानच्या काळात बांधकामाचा खर्च वाढल्याने प्रकल्प तब्बल नऊ कोटींनी महागला आहे. तसेच ही जागा अद्याप ताब्यात न आल्यामुळे भविष्यात हा खर्च वाढू शकतो. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाचे काम लांबल्याचे मान्य केले. तसेच जमीन पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नीलेश पानमंद, ठाणे