‘लोकसत्ता लोकांकिका’त सहभागी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे मनोगत; एसटीच्या प्रवासापासून अंत्ययात्रेच्या निरीक्षणातून संहितांची प्रेरणा

संहिता ही एकांकिकेचा प्राण असतो. तिच्याभोवती त्या संपूर्ण एकांकिकेचं विश्व उभं राहतं. त्यामुळेच ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या महाविद्यालयांचे कलाकार सध्या संहिता बळकट करण्यावर भर देत आहेत. केवळ वाचनच नव्हे तर रोजच्या निरीक्षणातूनही संहितेसाठीची कल्पना सुचल्याचे ही मंडळी सांगतात. एसटीच्या प्रवासातून वा अंत्ययात्रेतील निरीक्षणातून स्फुरणारी संहिता केवळ एकांकिकेलाच बळ देते असे नाही तर, जगण्याचेही ज्ञान वाटून जाते, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

एकांकिका साकारताना जिवंत अनुभव कलाकाराला प्रेक्षकांसमोर मांडावा लागतो. त्यामुळे एकांकिका ही शब्दातून जिवंत असायली हवी आणि जिवंतपणा कथेच्या, एकांकिकेच्या संहितेतून येत असतो, हाच प्रयत्न ‘लोकसत्ता लोकांकिका’त सहभागी होणाऱ्या तरुणांकडून करण्यात आला आहे. वेगवेगळ्या धाटणीचे वाचन केले असल्याचे कलाकार सांगत आहेत. रोजच्या जगण्यातून विषय गवसले असल्याने अगदी साध्या विषयावर एकांकिका साकारल्याचे स्पर्धक सांगत होते.

मावशीची मदत

जे. जे. रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या मावशीची एकांकिका लिहिण्यासाठी मदत झाली असल्याचे बिर्ला महाविद्यालयाच्या समीर सुमंत याने सांगितले. एकांकिकेच्या पुढील लिखाणासाठी अच्यूत गोडबोलेंच्या ‘मनात’ या पुस्तकातून त्या विषयाचा योग्य गाभा उलगडला. कथा लिहीत असताना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदल होत गेले. आपल्याला एखादी घटना चुकीची वाटते तर ती चूक असतेच असे नाही, त्या घटनेची दुसरी बाजूही असते. घटनांच्या दोन्ही बाजूू संहितेत मांडू शकलो आणि ती एकांकिका ‘लोकांकिका’च्या मंचावर सादर होत आहे हीच बाब माझ्यासाठी अभिमानाची असल्याचे समीर सांगतो.

अंत्ययात्रेच्या निरीक्षणाने मदत केली.

कल्याणच्या के. एम्. अग्रवाल महाविद्यालयाच्या अश्वजित कांबळेच्या आंबिवली येथील घराजवळच स्मशानभूमी आहे. ‘‘स्मशानात जाणाऱ्या अंतयात्रा मी रोज पाहायचो. प्रत्येक माणसाचा जन्म आणि मृत्यू हे सारखेच असते. या दोन घटनांमध्ये सारखेपणाच आहे. म्हणून या अटळ गोष्टींवरच एकांकिका लिहायचे ठरवले,’’ असे अश्वजित म्हणाला.

एसटी प्रवासात विषय सुचला.

मॉडेल महाविद्यालयासाठी एकांकिका लिहिणाऱ्या संदीप दंडवते याने तर एसटी बसमध्येच एकांकिका लिहिल्याचे सांगितले. सतत पुणे-अहमदनगर-नाशिक असा प्रवास करणारा संदीप प्रवासादरम्यान वर्तमानपत्र वाचायचा, मोबाइलमध्ये बातम्याही पाहायचा. त्या वेळी त्याला गेल्या काही दिवसांपासून मंदिरे, धर्म आणि राजकारण हे विषय महत्त्वाचे वाटू लागले. या सर्व गोष्टींमुळे मानवजातीचा बळी जात आहे आणि सामाजिक जागृती व्हायला हवी असे वाटले. त्यातूनच त्याने एकांकिका लिहिली. सहप्रवाशांच्या गप्पा, हावभाव, सवयी यांतून संहितेला आकार मिळाला, असेही तो सांगतो.

मुलाखती, चित्रपट पाहिले.

सी.एच.एम. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी रोमारिओ काडरेझ याने आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या घडामोडींवरच बोट ठेवून विषयाची मांडणी केली असल्याचे सांगितले. समाजाच्या  रोजच्या घडामोडी पाहून आम्हाला प्रश्न पडले. त्यांचे उत्तर शोधण्याच्या प्रवासात ही संहिता जन्माला आली असल्याचे रोमारिओ सांगतो. यासाठी अनेक मोठय़ा व्यक्तींच्या मुलाखती पाहिल्या, विषयासंदर्भातील सिनेमांचीदेखील दखल घेतली असल्याचे त्याने  सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलीकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.