राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल; २२७ फलक आणि ५२१ झेंडे उतरवले

कोकण शिक्षक मतदारसंघ तसेच ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत शहरातील विविध भागांमध्ये राजकीय पक्षांमार्फत उभारण्यात आलेले २२७ फलक आणि ५२१ झेंडे प्रशासनाने उतरविले असून याप्रकरणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

आचारसंहितेचा भंग करण्यात नौपाडा, कोपरी, वागळे, लोकमान्य-सावरकर, कळवा आणि मानपाडा परिसरातील कार्यकर्ते आघाडीवर आहेत, तर रायलादेवी, उथळसर आणि मुंब्रा भागात एकही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला नाही. ठाणे महापालिका निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचे बेत सत्ताधारी शिवसेनेने आखले होते. दोन आठवडय़ांपूर्वी उद्घाटन कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रकल्पांचे उद्घाटन करता आले नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेने शहरभर फलकबाजी आणि पक्षाचे झेंडे लावून वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ठाणे शहरात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्ताने ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी शहरभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांच्या स्वागताचे फलक आणि पक्षाचे झेंडे उभारले होते. आचारसंहितेच्या काळात या फलकबाजीविरोधात राष्ट्रवादीने मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेसचे नेते नारायण राणे उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसनेही राणे यांच्या स्वागतासाठी बैठकीच्या परिसरात फलकबाजी केली होती. आचारसंहितेच्या काळात शहरात सुरू असलेल्या राजकीय फलकबाजीवरून महापालिका प्रशासनावर टीका होऊ लागली होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशा फलकांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. कारवाईत सर्वच पक्षांच्या फलकाचा समावेश आहे. याप्रकरणी ३९ गुन्हे दाखल केले आहेत.