बदलापूरमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला अखेर मुहूर्त
गेल्या अनेक महिन्यांपासून अभय मिळालेल्या अतिक्रमणांवर अखेर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा हातोडा पडला. नगरपालिकेच्या वतीने बदलापूर पूर्वेतील कात्रप आणि रेल्वे स्थानक परिसरातील अनेक टपऱ्या, दुकाने आणि झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर पालिकेतर्फे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गुरुवारी झालेल्या महासभेत या संदर्भात नगरसेवकांनी पालिकेच्या धोरणावर टीका केली. त्यावर येत्या ५ मे रोजी पुरेशा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवली जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिले.
बदलापुरातील अनधिकृत झोपडय़ा, टपऱ्या आणि बांधकांमांबाबत पालिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून मवाळ धोरण स्वीकारले होते. त्यामुळे शहरात बिनदिक्कतपणे अतिक्रमणे होत होती. याबाबत अनेक नगरसेवकांनीही तक्रारी केल्या होत्या. तसेच पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय मोठय़ा प्रमाणावर चर्चिला गेला होता. मार्च महिन्यात झालेल्या सभेत आठवडाभरात अतिक्रमणांवर हातोडा चालवला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिना झाला तरी त्याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नव्हती. अखेर बुधवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात कात्रप भागात कारवाईला सुरुवात करीत जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे भुईसपाट केली.
कात्रप भागातील नाल्याजवळ रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या १०-१२ झोपडय़ा तसेच याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली एक चहाची टपरी, जुन्या कात्रप रोड भागातील एक-दोन दुकाने तसेच चायनीज खाद्य पदार्थाच्या दुकानांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. यानंतर रेल्वे स्टेशनलगतच्या परिसरातील स्कायवॉकखालील दोन टपऱ्या तोडून टाकण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवरही विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास होत होता. हे अनधिकृत विक्रेते जास्त वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.