‘ड’ वर्ग ग्रंथपालांचे मासिक वेतन अवघे १ हजार ३८९ रुपये
मराठी साहित्य आणि वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शासन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या वतीने राबविल्या जात असलेल्या योजनांसाठी कोटय़वधी रुपये खर्च होत असले तरी पुस्तके आणि वाचक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असणारा ग्रंथालय कर्मचारी मात्र कायम उपेक्षितच राहिला आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनातही ‘वर्ग’भेद असून ‘ड’ वर्ग ग्रंथालयांचे ग्रंथपाल असणाऱ्यांना अवघे १ हजार ३८९ रुपये दरमहा वेतन मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अत्यंत अपुऱ्या अनुदानामुळे मोजक्या वाचकांकडून मिळणाऱ्या जेमतेम वर्गणीवर कशीबशी ही ग्रंथालये टिकून आहेत. ठाणे जिल्हय़ात एकूण १४४ ग्रंथालये असून त्यापैकी निम्मीअधिक म्हणजे ८५ ग्रंथालये ‘क’ आणि ‘ड’ वर्गाची आहेत. ‘क’ वर्ग ग्रंथालयाच्या ग्रंथपालांनाही फक्त साडेचार हजार रुपये वेतन मिळत आहे.
ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना ग्रंथसेवा पुरवणाऱ्या ग्रंथपालांना मिळणारे वेतन अपुरे असल्याच्या चर्चा अनेकदा अधिवेशनात झाल्या. मात्र अद्याप ग्रंथपालांना पुरेसे वेतन उपलब्ध होईल अशी कोणतीही तरतूद शासनाकडून करण्यात आलेली नाही. जिल्हा ग्रंथालयाच्या ‘अ’ वर्गातील ग्रंथपालांना ‘क’ आणि ‘ड’च्या तुलनेत काहीसे बरे वेतन दिले जात असले तरी तेही जेमतेम दहा हजारांच्या आसपास आहे. कंत्राटी स्वरूपात नोकरी करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कामगारालाही त्यापेक्षा जास्त वेतन मिळते.
वाचकांना त्वरित हवे ते पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथालयातर्फे ग्रंथपालांची नेमणूक करण्यात येते. ग्रंथपाल होण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम लागू केलेला आहे. मात्र या अभ्यासक्रमात उत्तीर्ण होऊन ग्रंथालयात रुजू झाल्यावर तुटपुंज्या वेतनाअभावी ग्रंथपालांच्या पदरी निराशा येते. ठाणे जिल्हय़ात एकूण १४४ ग्रंथालये आहेत. ग्रंथालयाने पूर्ण अनुदान मिळवण्यासाठी अनुदानापेक्षा जास्त खर्च करण्याची अट शासनामार्फत देण्यात आली आहे. हा नियम सर्व वर्गातील ग्रंथालयांसाठी लागू आहे. ‘अ’ दर्जा प्राप्त केलेल्या ग्रंथालयात ग्रंथपाल, साहाय्यक ग्रंथपाल, निर्गम साहाय्यक ग्रंथपाल, लिपिक, दोन शिपाई असे सहा कर्मचारी रुजू करणे बंधनकारक आहे. अनुदानापैकी अध्र्या अनुदानात कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे वाटप करावे लागते. मात्र ग्रंथालयाच्या देखरेखीसाठी लागणारा खर्च जास्त असल्याने सभासदांच्या वर्गणीतून अनेकदा ग्रंथपालांना वेतन मिळते, असे ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथपाल विनिता गोखले यांनी सांगितले.
जिल्हापातळी किंवा ‘अ’ दर्जाच्या ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना त्यातला त्यात बरे वेतन मिळत असले तरी तालुका किंवा गावपातळीवर मात्र खूपच वाईट अवस्था आहे. तालुका ‘ब’ वर्गाच्या ग्रंथपालांना ७,३००, ‘इतर ब’ वर्गाच्या ग्रंथपालांना ४,३०० आणि ‘क’ वर्गाच्या ग्रंथपालांना अवघे तीन हजार रुपये वेतन मिळते. ड वर्गाच्या ग्रंथालयांना वार्षिक ३० हजार रुपये अनुदान आहे. या ग्रंथालयात फक्त ग्रंथपाल ही एकमेव व्यक्ती उपलब्ध असते. असे असूनही कामाच्या मोबदल्यात पुरेसा पगार उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रंथालयाकडे नोकरीसाठी वळणाऱ्या तरुणांपुढे भविष्यात आव्हान दिसून येत आहे.

ग्रंथालयाला दिली जाणारी अनुदानवाढ हा पूर्णपणे शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. शासनाने तसा निर्णय घेतल्यास संचालनालय त्याची अंमलबजावणी करेल. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या संघटनेने तशा मागण्यांचे निवेदन आमच्याकडे दिल्यास आम्ही ते शासनाकडे पाठवू.
– डॉ. किरण धांडोरे, ग्रंथालय संचालक, मुंबई.
२५ वर्षे सातत्याने ग्रंथपालाची नोकरी करूनही महिना ४,५०० रुपये पगार मिळतो. अधिवेशनात पगारवाढीसंदर्भात चर्चा होतात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. अनुदानामध्ये वाढ झाली तरी ग्रंथपालांच्या पगारांमध्ये वाढ होत नाही. मिळणाऱ्या अनुदानात ग्रंथालयाचा सर्व खर्च भागत नसल्याने संस्थेला इतर खर्च करावा लागतो.
– दीप्ती फडके, ग्रंथपाल ‘ब’ वर्ग ग्रंथालय