मांडा टिटवाळा परिसरात दैनंदिन कचरा उचलला जात नसल्याने येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सफाई कामगार आहेत परंतु ते काम व्यवस्थित करीत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात पाऊस पडल्याने कचऱ्याला दरुगधी पसरली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे पालिकेने परिसरातील साफसफाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

घंटागाडय़ा वेळेवर फिरकत नसल्याने येथील कचराकुंडय़ा ओसंडून वाहत आहेत. झोपडपट्टी विभागातील अवस्था तर अत्यंत दयनीय अशाच स्वरूपाची झाली आहे. येथील लहान मुले या कचराकुंडय़ांच्या बाजूलाच खेळत असतात. नुकताच पाऊस झाल्याने हा कचरा सडून त्यातून मोठय़ा प्रमाणात दरुगधी येत आहे. येथून नागरिक ये-जा करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. वृत्तपत्रातून बातम्या आल्यानंतर पालिकेला जाग येते आणि साफसफाईचा दिखावा केला जातो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छता अभियान केवळ मोठमोठय़ा शहरांपुरतेच मर्यादित आहे की काय? असा प्रश्न पडतो.

रस्त्यावर वाहने उभी करणे रोखा

राजेंद्र करमरकर, डोंबिवली

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने पादचाऱ्यांना ये-जा करताना त्याचा त्रास होतो. मात्र ही समस्या केवळ स्थानक परिसरातील नाही तर प्रत्येक प्रभागात ही समस्या जाणवते. अनेक सोसायटय़ांना वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने येथील रहिवासी हे रस्त्यावर आपली वाहने उभी करतात. एकतर रस्ता अरुंद, त्या काठच्या पदपथांवर अतिक्रमणे आणि त्यात भरीस भर म्हणून सोसायटय़ांमधील वाहने. मग नागरिकांनी चालायचे कसे?  ट्रक, टेम्पो यांसारखी वाहने तर तेथून जाऊच शकत नाहीत. अशा वेळेस कधी काळी जर मोठी दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाची गाडीही या रस्त्यावरून जाऊ शकणार नाही. आयुक्तांनी आता रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीला अडचण निर्माण होणार नाही. मात्र रस्त्यावरील अनधिकृतरीत्या पार्क करून ठेवल्या जाणाऱ्या वाहनांना मात्र रोखणे आवश्यक आहे.

एस.टी., टीएमटीवर फलक हवेत

दीपक प्रधान, ठाणे</strong>

शहरात फिरणाऱ्या एस.टी.बस आणि ठाणे परिवहन महामंडळाच्या बस नेमक्या कोणत्या ठिकाणच्या स्थानकावर जाणार हे अनेकदा कळत नाही. पूर्वी बसवरील मोकळ्या जागेत लावण्यात येणारे फलक सहज दिसायचे. वर्षांनुवर्षे बसवर फलक लावण्याची पद्धत सध्या अमलात आणली जात नसल्यामुळे बसस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना समस्या उद्भवते. बस नेमकी कोणत्या ठिकाणी जाते याची प्रवाशांना माहिती नसते. बसचे वाहक-चालक स्वत: या संदर्भात कोणतीही माहिती देत नाहीत. बस स्थानकावर बस न थांबता पुढे नेल्या जातात. फलक न लावण्याच्या निष्काळजीपणामुळे चालती बस पकडण्याचा धोका ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळेच्या विद्यार्थ्यांना बसतो. प्रवासी नागरिकांचे हाल लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बसच्या वाहक, चालकांना बसच्या मोकळ्या जागेत बसस्थानकाच्या नावाचा फलक लावण्यास सक्तीचे करावे.