थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या पाटर्य़ाचे बेत आखले जातात. याच काळात मासेही चांगले मिळतात. त्यामुळे मत्स्याहार हा अशा मेजवान्यांचा अविभाज्य भाग असतो. सामिष पाटर्य़ामध्येही आता खवय्ये कमालीचा चोखंदळपणा दाखवू लागले आहेत. चुलीवरचे अथवा घरगुती चिकन, तळलेले मासे, चिकन-वडे आणि भाकरी असा हटके बेत असतो. ठाणे पूर्व विभागातील अनुसया या कॉर्नरवर अशा प्रकारच्या बेतासाठी खवय्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. मांसाहारी खवय्यांप्रमाणे शाकाहारी मंडळींसाठीही येथे खास पदार्थ मिळतात. विशेषत: येथील काजूची भाजी खाण्यासाठी लोक मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात.

कोकणातील मालवण म्हणजे माशांचे झणझणीत कालवण आणि भात असा चविष्ट बेत डोळ्यासमोर येतो. मात्र मालवणची ही अस्सल चव आता ठाण्यातही उपलब्ध आहे. अनुसया त्यापैकी एक. चिकन-सागोती नावाचा एक चिकनचा पदार्थ आहे. चिकनचा सुका रस्सा, चिकन-वडे आणि सोलकढी असे तिन्ही पदार्थाचे कॉम्बिनेशन म्हणजे चिकन-सागोती. टोमॅटो, मालवणी मसाला, कांदा, गरम मसाल्याचे पदार्थ टाकून सुरुवातीला रस्सा तयार केला जातो. त्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून शिजवले जाते. त्याची चव अक्षरश: लाजबाब आहे. तोंडाला पाणी सुटते. मालवणमध्ये जेव्हा चिकनसोबत वडे दिले जातात, तेव्हा त्याला सागोती म्हणतात, अशी माहिती दुकानाचे मालक अनिकेत यांनी दिली. गरमागरम चिकन-वडे आणि सोबतीला सोलकढी हा मेनू अतिशय प्रसिद्ध आहेच. मात्र या चिकन सागोतीबरोबर लुसलुशीत आंबोळी किंवा घावणेही खूप चविष्ट लागतात. ज्यांना चिकन आवडत नाही, त्यांच्यासाठी मटण सुक्का कलेजी, भेजा फ्राय मसाला हे पदार्थही उपलब्ध आहेत. अनेक खवय्ये माशांचे गरमागरम कालवण घरी घेऊन जातात. त्यामुळे वाफाळता भात आणि माशाचे कालवण हा मेनू अधिक रुचकर असतो. अनसूया  हे कॉर्नर सुरू होऊन आता दोन वर्षे झाली. जागा अपुरी असल्याने इथे बसून खाता येत नाही. एक तर उभ्याने खावे लागते अथवा पार्सल घेऊन जावे लागते. मालवणी पद्धतीने तळलेले बोंबील, मांदेळी, बांगडा, सुरमई आदी मासे येथे मिळतात. येथील मासे ताजे असतात. रोजच्या रोज बाजारात जाऊन माशांची खरेदी केली जाते, असे अनिकेत सांगतात. स्टफ पापलेट हा अजून एक मालवणातील खास पदार्थ आहे. हे पापलेट तळताना त्यामध्ये मालवणी मसाला भरला जातो. रव्यामध्ये लडबडून ते तळले जाते. त्यामुळे या कुरकुरीत आणि रुचकर पापलेटला खूप मागणी असते. विशेष म्हणजे इथे जवळाही मिळतो. भाकरी आणि जवळा खाण्यासाठी खवय्यांची इथे रीघ लागलेली असते. वांग्या-बटाटय़ाच्या भाजीतही जवळा टाकला जातो. शिवाय सर्वाचाच ऑल टाइम फेव्हरट मासा म्हणजे कोलंबी. येथील कोलंबीचे कालवणही आवडीने खाल्ले जाते. शाकाहारींसाठी इथे कुलथाचे पिठले आणि भाकरीही मिळते. काही शाकाहारी खवय्ये अपवादाने अंडय़ाचे पदार्थ आवडीने खातात. शाकाहारी पदार्थामध्ये अस्सल मलावणी मसाला आणि खोबऱ्याचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी खास अंडा बुर्जी, अंडय़ाचे कालवण आदी पदार्थही उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खाद्य पदार्थासाठी वापरले जाणारे मसाले खास मालवणहून आणले जातात. त्यासाठी दर दोन महिन्यांनी मसाले आणण्यासाठी मालवणला जावे लागते, असेही अनिकेत यांनी सांगितले. दर महिन्याला पाच किलो मसाला सहज संपतो. इथे वालाचे बिरडेही मिळते. त्याला खूप चांगली मागणी आहे. रस्त्यावर असल्याने येता-जाता खवय्ये इथून पार्सल घेऊन जातात. गुरुवारी मात्र हे दुकान बंद असते. ऋतुकालोद्भव अनेक पदार्थ येथे मिळतात. उदा. अळूचे फतफते विविध प्रकारच्या पालेभाज्या येथे उपलब्ध असतात. अर्थातच शाकाहारी मेन्यू दररोज बदलतो. पार्सल देण्याची पद्धतही अत्यंत आकर्षक आहे. पदार्थ सांडू नयेत, याची काळजी विशेष करून घेतली जाते.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…

अनुसया कॉर्नर, कोपरी, ठाणे (पूर्व)

  • कधी- सकाळी १० ते २ आणि सायंकाळी ५ ते रात्री १०.३०
  • कुठे- दुकान क्र. १०, शंकर सीएचएस, साईबाबा गॅस एजन्सी जवळ, के. पी. बोरकर मार्ग, कोपरी कॉलनी ठाणे (पू.)