विक्रेत्यांची पाठ; कोटय़वधी रुपये पाण्यात
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई : वसई-विरार महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी मासळी, भाजीपाला आणि इतर वस्तूंची विक्री करण्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च करून बाजारकेंद्रे उभारली आहेत. परंतु या बाजारकेंद्रांकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याने ती ओसाड झाली आहेत.
शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करता येतील या उद्देशाने पालिकेने बोळिंज, नवघर-माणिकपूर, सोपारा येथे भाजी व मासळी बाजार केंद्रे उभारली आहेत. पालिकेला यातून चांगले उत्पन्न मिळेल आणि नागरिकांनाही चांगल्या सुविधा एकाच ठिकाणी मिळतील, असा पालिकेचा उद्देश होता. परंतु ही सर्व बाजारकेंद्रे धूळ खात पडली असून त्याचा वापर महापालिकेच्या कचराकुंडय़ा व कचऱ्याच्या छोटय़ा गाडय़ा ठेवण्यासाठी केला जात आहे. तसेच याची सुरुवात न झाल्याने संपूर्ण बाजारच ओस पडून राहिले आहे. त्यामुळे याठिकाणी मद्यपींचा आणि गद्र्दुल्यांचा वावर वाढला आहे. वसई पूर्वेतील भागात नवघर परिसरात मासळी बाजार केंद्र आहे. या बाजाराच्या ठिकाणी सध्या कोणाचेही लक्ष नसल्याने त्याठिकाणी दारू पिणे, इतर गैरकृत्य करणे, वाहने पार्किंग करणे असे प्रकार घडू लागले आहेत. बोळींज येथेही दोन मजली बाजार केंद्र तयार केले आहे. त्यामध्ये एका ठिकाणी मासळी विक्रेते आणि दुसरीकडे फळभाजा विक्रेत्यांना बसण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली. तसेच बर्फ तयार करण्यासाठीचा ईटीपी प्रकल्पही तयार करण्यात आला आहे. परंतु या ठिकाणीही विक्रेते येऊन न बसल्याने ते बंद करण्यात आले आहे.
नालासोपारा येथेही गेल्या वर्षी मासळी विक्री केंद्र तयार करण्यात आले. मात्र त्याठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग अवघड असल्याने विक्रेते आणि ग्राहक कसे जातील, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
शासन व पालिका मिळून शहरातील विक्रेत्यांच्या सोयीसाठी बाजारकेंद्रे तयार केली होती. बाजारकेंद्रांमध्ये भाजी विक्रेते आणि मासळी विक्रेत्यांना बसण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी पाठ फिरवली. ही बाजारकेंद्रे चांगल्या प्रकारे सुरू झाली पाहिजे यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत
– राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका
विक्रेत्यांचा प्रतिसाद नाही
महापालिकेने बाजार केंद्र उभारल्यानंतर विविध ठिकाणी रस्त्यावर बसणारे मासळी विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांना भेटून बाजारामध्ये विक्रीसाठी येऊन बसा, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र जर आम्ही त्याठिकाणी आलो तर आमच्याकडे ग्राहक येणार नाही. आमचे नुकसान होईल, असे सांगून विक्रेत्यांनी या बाजारकेंद्रांकडे पाठ फिरवली. बाजारामध्ये येऊन बसावे यासाठी वारंवार जनजागृतीही केली. परंतु याला विक्रेत्यांचा प्रतिसाद लाभला नाही, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. बाजारकेंद्रे भंगाराचे गोदाम कोटय़वधी रुपये खर्चून तयार केलेल्या बाजारकेंद्रांकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याने सध्या या ठिकाणी पालिकेने कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य, कचऱ्याचे तुटलेले डब्बे आणि इतर भंगाराचे साहित्य आणून टाकले असल्याने संपूर्ण बाजारकेंद्र भंगाराचे गोदाम झाले आहे.