जयेश सामंत, किशोर कोकणे

विजेचे खांब, भूमिगत वाहिन्यांचे स्थलांतर करणार; खोदकामामुळे वाहतूक कोंडीची भीती

पावसाळ्याच्या दिवसांत शहरात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असा नियम असतानाही ठाणे महापालिकेने मेट्रो प्रकल्पाच्या कामांना मात्र, यातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान घोडबंदर आणि आसपासच्या परिसरातील महावितरणचे वीज खांब आणि भूमिगत वाहिन्या अडथळे ठरत आहेत. या वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खोदकाम हाती घ्यावे लागणार आहे. पावसाळय़ामुळे या खोदकामास विलंब होऊ नये, यासाठी मेट्रोच्या कामांना पावसाळय़ातही मंजुरी देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजना आणि आखणीसंबंधी ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातून आखण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा मुद्दा मांडण्यात आला. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने सुरू असून ही कामे करत असताना मोठय़ा प्रमाणावर खोदकामे केली जाणार आहेत. महावितरणची वीज वितरण व्यवस्थेच्या स्थलांतरणाचा मुद्दा नव्याने पुढे आल्याने मेट्रोचे काम पावसाळ्यात थांबविता येणार नाही, अशी भूमिका महानगर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेतील प्रशासकीय प्रमुखांकडे मांडली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत ही भूमिका मान्य करण्यात आली असून लवकरच ही कामे सुरू व्हावीत यासाठी या खोदकामांना मान्यता दिली जाणार आहे, असेही महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

घोडबंदर येथील मानपाडा, आर-मॉल, सूरज वॉटर पार्क, पातलीपाडा या भागात ज्या ठिकाणी विद्युत खांब आणि भूमिगत वाहिन्या आहेत. त्या मार्गानेच मेट्रो धावणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या उभारणीसाठी एमएमआरडीएला विद्युत खांब आणि भूमिगत वाहिन्या दुसऱ्या ठिकाणी हलवाव्या लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी महावितरणने याबाबत एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार करून हे काम एमएमआरडीएनेच करावे, अशी मागणी केली. त्यामुळे आता या वीजवाहिन्या कशा आणि कुठे हलवाव्यात याचे नियोजन प्राधिकरण करत आहे. ‘आम्ही काही दिवसांपूर्वीच एमएमआरडीए आयुक्तांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. या कामासाठी थोडय़ा कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे,’ अशी माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.