समान वाटपाच्या धोरणामुळेच शहरावर अन्याय
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पाण्याचे समान वाटप व्हावे आणि पाण्याचा साठा जास्त कमी होऊ नये यासाठी शनिवारी आणि रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या लघु पाटबंधारे विभागाच्या धोरणाचा मीरा-भाईंदर शहरांना सर्वाधिक फटका बसू लागला आहे. उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना पाणीपुरवठा होत असताना जलस्रोतापासून लांब असलेल्या मीरा-भाईंदपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे अन्य शहरांत ३० टक्के पाणीकपात असताना मीरा-भाईंदरवासियांना मात्र ४५ टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे.
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पाणीसाठा कमी शिल्लक असल्याने सप्टेंबर महिन्यापासून विविध शहरांत वेगवेगळय़ा दिवशी ३० टक्के पाणीकपात राबवण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक महापालिका वेगवेगळय़ा दिवशी पाणी उचलत असल्याने धरणातून उल्हास नदीत येणाऱ्या पाण्याची नियमित उचल होत असून त्यामुळे पाणीसाठय़ाची बचत होत नाही. या पाश्र्वभूमीवर लघु पाटबंधारे विभागाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या दिवशी धरणातून उल्हास नदीच्या पात्रात पाणी न सोडण्याचेही ठरवण्यात आले. या नव्या धोरणामुळे मीरा-भाईंदरला शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शिवाय जलस्रोताच्या दुसऱ्या टोकाला असल्यामुळे या शहरांपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून त्यामुळे मंगळवार आणि बुधवारीही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आठवडय़ातील पाच दिवस या शहरांना पाणीच मिळेनासे झाले आहे. उल्हास नदीवर मिरा भाईंदर महापालिकेचे आठ पंप लावण्यात आले आहेत मात्र सध्या दोन अथवा तीनच पंप सुरु आहेत. याचा थेट परिणाम पाणीपुरवठय़ावर होत आहे.
पाणी कपातीनंतर जिल्ह्य़ातल्या इतर महापाीलकांना तीस टक्के पाणीकपात होत असली तरी मिरा भाईंदर हे पाण्याच्या स्त्रोतापासून शेवटच्या टोकाला असलयाने मिरा भाईंदरची पाणी कपात तब्बल चाळीस टक्क्य़ांवर जात आहे. गेल्या दोन महिन्यातल्या पाणीपुरवठय़ाच्या आकडीवर नजर टाकल्यास हे सहज स्पष्ट होत आहे. शिवाय जिल्ह्य़ातल्या इतर महापालिकेत दरडोई दोनशे ते अडीचशे लिटर पाणी दररोज उपलब्ध असताना मिरा भाईंदरमध्ये मात्र हेच प्रमाण दरडोई शंभर लिटर इतकेच आहे. स्टेम प्राधिकरणाच्या पाणी कपातीमधून सुट मिळाली तरच मिरा भाईंदरची पाणी कपात इतर महापालिकांच्या पातळीवर म्हणजेच तीस टक्क्य़ांवर येते. यासाठी लघु पाटबंधारे विभागाने लादलेले नवे धोरण मागे घेऊन पूर्वीसारखाच पाणीपुरवठा सुरु ठेवणे आवश्यक असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकडेवारी
* पाण्याचा स्रोत –
एमआयडीसी’ महिना -डिसेंबर मंजूर पाणी – १५५० एमएलडी मिळालेले पाणी ८९३ एमएलडी कपातीची टक्केवारी – ४२ टक्के
* महिना – जानेवारी
*मंजूर पाणी – १५५० एमएलडी
* मिळालेले पाणी ९७१ एमएलडी
* कपातीची टक्केवारी – ३७ टक्के
*गेल्या दोन दिवसात झालेली कपात सुमारे ४५ टक्के

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayandar facing 45 percent water cut
First published on: 12-02-2016 at 02:41 IST