‘काम बंद’ आंदोलनापुढे मीरा-भाईंदर पालिका प्रशासन नमले
मीरा-भाईंदर महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना राज्य शासनाच्या नव्या किमान वेतन धोरणानुसार वेतन देण्याचे प्रशासनाने मान्य केले. त्यानंतर कामगारांनी पुकारलेले ‘काम बंद’ आंदोलन गुरुवारी मागे घेतले.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शासनाने किमान वेतनात सुधारणा केली. हे किमान वेतन मीरा-भाईंदर महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना लागू व्हावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली होती; परंतु आर्थिक तरतुदीचे कारण दाखवत किमान वेतन देण्यास प्रशासनाने असमर्थता व्यक्त करताच महापालिकेतील सुमारे दीड हजार कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारले. कामगारांनी कचरा उचलण्याचे बंद केल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू लागले. प्रशासनाकडून एप्रिल महिन्यापासून किमान वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जानेवारी महिन्यापासूनच किमान वेतन मिळाले पाहिजे, या मागणीवर कामगार ठाम राहिल्याने यावर तोडगा निघू शकला नव्हता. कामगारांचे आंदोलन गुरुवारी सकाळीही सुरूच राहिल्याने अखेर प्रशासनाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले. जानेवारी महिन्यातील किमान वेतनाचा फरक २५ फेब्रुवारीपर्यंत देण्यात येऊन यापुढे किमान वेतनानुसारच कामगारांना वेतन देण्याचे प्रशासनाने मान्य केल्याने कामगारांचा संप मागे घेण्यात येत असल्याचे श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी जाहीर केले.