गेल्या दोन महिन्यांपासून वीज ग्राहकांना वाढीव स्वरूपात विजेची बिले येत आहेत. यासंदर्भात विचारणा करण्यास गेलेल्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून नीट उत्तरे दिली जात नाहीत. ग्राहकांनी अखेर मनसे कार्यकर्त्यांकडे धाव घेत याविषयी आवाज उठविण्यास सांगितले असता मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी ग्राहकांसह महावितरण कार्यालयास भेट दिली. या वेळी अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या समस्या सांगून त्यांना ग्राहकांच्या शंकांचे योग्य निरसन व्हावे व वीज बिल कमी करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. वीज मीटरसंदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असून दुसऱ्या टप्प्यात वीज मीटर बदलण्याचे काम सुरूहोणार असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
शहरातील अनेक वीज ग्राहकांना वाढीव स्वरूपात विजेची बिले येत आहेत. वीज ग्राहकांचा प्रत्यक्ष वापर शंभर युनिट असताना त्यांना दोनशे युनिट वापराचे बिल दिले जात आहे. याविषयी ग्राहकांमध्ये संभ्रम असल्याने त्यांनी बिल भरण्यास नकार दिला आहे. तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना आधी बिल भरा, नंतर काय ते पाहू अशी उत्तरे दिली जातात. वीज वितरण कंपनीकडून लावण्यात आलेले मीटर हे जास्त गतीने पळत असल्याने ते जास्तीचे रीडिंग दाखवत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला नाहक भरुदड बसतो, असे मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटरसंदर्भात अनेक ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत एक हजार मीटर बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. आणखी चार हजार मीटर बदलण्यात येणार आहेत. अनेक वीज बिलावर रीडिंगचा फोटो नसल्याने त्या ग्राहकांना सरासरी बिले दिली गेली आहेत. तीसुद्धा जास्त प्रमाणात असल्याचे ग्राहकांनी सांगताच मीटर बदलण्याचे काम सुरूआहे, त्यानंतर तक्रारीला वाव मिळणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या वेळी मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, मनोज राजे, राहुल चितळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.