दहा महिन्यांत वसईतून ८८ तर पालघर येथून १० मोबाइल चोरीच्या घटना
पश्चिम रेल्वे स्थानके आणि उपनगरी रेल्वेगाडय़ांमध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत मोबाइल चोरटोळ्यांनी वसई पट्टय़ातील रेल्वेस्थानकांना कार्यक्षेत्र बनवले आहे. गेल्या दहा महिन्यांत वसई रेल्वे विभागातून ८८ तर पालघर रेल्वे विभागातून १० मोबाइलच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, यामागे अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांचा हात असल्याचे समोर येत आहे.
रेल्वेतीेल गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. विरार, नालासोपारा, वसई, भाईंदर आदी रेल्वे स्थानकांमध्ये सर्वाधिक मोबाइल चोरी होत आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षांतीेल जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत वसई रेल्वे विभागातून ८८ तर पालघर रेल्वे विभागातून १० मोबाइल चोरी झाले आहेत. अर्थात या तक्रारी केवळ या स्थानकात नोंदविल्या गेलेल्या आहेत. मोबाइल चोरीच्या घटना मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकात नोंदविल्या जात असल्याने त्याच्या नोंदी नसल्याचे पोलिसांनी सांगितले
‘प्रवासी स्थानकात आल्यापासून मोबाइल चोर त्याच्यावर पाळत ठेवतात. लोकल आल्यावर तो आपला मोबाइल कुठे ठेवतो ते हेरले जाते. बऱ्याचदा लोकलमध्ये चढेपर्यंत प्रवासी मोबाइलवर बोलत असतात त्यामुळे चोरांना ती संधी साधून मोबाइल लंपास करणे सोपे जाते,’ असे साहाय्यक पोलीस निरीक्षक रितेश अहेर यांनी सांगितले.
मोबाइल चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. ही मुले लहान असल्याने त्यांच्यावर कुणाचा लवकर संशय जात नाही. पटकन मोबाइल हिसकावून ते गर्दीतून पसार होत असतात, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.

काय काळजी घ्याल?
* मोबाइल चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.
* लोकलच्या डब्यात दारात उभे राहून बोलणे टाळावे. बाहेरून काठीने हातावर फटका मारून मोबाइल खाली पाडला जातो.
* लोकलमध्ये चढताना आणि उतरताना कधीच मोबाइलवर बोलत उतरू अथवा चढू नये.