रहिवाशांचा विरोध डावलून खासगी कंपनीची मनोरा उभारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेचे मोबाइल मनोरा धोरण नसताना वसईत अनधिकृत मोबाइल मनोर उभारण्याचे काम सुरूच आहे. वसई पूर्वेच्या स्वामी समर्थनगरमध्ये रहिवाशांचा विरोध डावलून खासगी कंपनीचा मोबाइल मनोरा उभारण्यात येत आहे. त्याविरोधात स्थानिक रहिवासी आक्रमक झाले आहेत.

वसई-विरार महापालिकेने अद्याप मोबाइल मनोरे धोरणच तयार केलेले नाही. त्यामुळे शहरात शेकडो अनधिकृत मोबाइल मनोरे उभे राहिले आहेत. या मोबाइल मनोऱ्यांकडून कसलेच कर अथवा शुल्क आकारले जात नसल्याने महापालिकेचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडत आहे. पालिकेचे काहीच नियंत्रण नसल्याने शहरात अनधिकृत मोबाइल मनोरे उभे राहत आहे. वसई पूर्वेच्या प्रभाग क्रमांक ९२ मधील स्वामी समर्थ नगर परिसरात रहिवासी संकुलांच्या शेजारी एका खासगी कंपनीचा मोबाइल मनोरा उभा करण्याचे काम सुरू आहे. या परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, रहिवासी इमारती असून बालभवन उभे राहणार आहे. त्यामुळे अशा निवासी इमारती असलेल्या परिसरात मोबाइल मनोरा उभा करण्यास परवानगी देऊ  नये, असे पत्र स्थानिक नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी मार्च महिन्यात नगरविकास खात्याला दिले होते. या परिसरातील सर्व रहिवासी संकुलांनीही मोबाइल मनोरे उभे करण्यास हरकती घेतल्या असून तसे पत्र त्यांनी महापालिकेला दिले होते. मात्र रहिवाशांचा विरोध डावलून या भागात मोबाइल मनोरे उभे करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेचे नियंत्रण नसल्याने शहरात बेकायदा मोबाइल मनोऱ्यांचे पेव फुटल्याचा आरोप नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी केला आहे. जे अनधिकृत मोबाइल मनोरे उभे आहेत, त्यावर तर महापालिका कारवाई करत नाही, पण आगाऊ  तक्रारी करूनही या मनोऱ्याचे काम थांबवले जात नाही, असे त्यांनी सांगितले. महापालिका केवळ कारवाई करू, असे उत्तर देत आहे. या अनधिकृत मोबाइल मनोऱ्यांमुळे रहिवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile tower problem
First published on: 02-06-2018 at 00:33 IST